
चाले तुरुतुरु अन धावे भरभर
एका जागी तिचे न बुड स्थिर
एकटीच नाही ती गोतावळा भाराभर
शिस्तीत चालती सगळ्या लवकर
अहो, ओळखले नाही का तुम्ही?
ही तर मुंगी जी व्यापून टाकते घर
थोडीही हलगर्जी पडते हिच्या पथ्यावर
उघडे अन्न पदार्थ असो गरम वा गार
मोहीम फत्ते घेता सामूहिक समाचार
चालते काम अविरत नसे ऋतूचा विचार
गटागटाने अविरत काम चाले शिस्तीवर
अन्न जमवणे ध्यानीमनी एकच विचार
ध्येय एकच एकजुटीने करिती संसार
कुशल संघटक, ध्येयवादी, कार्यात तत्पर
आळसाचा ना लवलेश काम करी झरझर
संपवून काम पुढेच चाले न राही स्थिर
लोभ, मोह, माया हिला वाटे क्षणभंगुर
मुंगीसम बहू जीव व्यापती चराचर
गुरुच आपल्या जीवनाचे हे अंतिम सार
बुद्धिप्रामाण्यवादी करिती मनीं विचार
अश्याच महत्तम गुरूंना वंदन हे त्रिवार !
(स्वरचित)
नीला चित्रे
पुणे चिंचवड














