prabodhini news logo
Home चंद्रपूर लॉयडस् इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश...

लॉयडस् इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व क्रीडा साहित्याचे वाटप

0
160

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या लॉयडस् मेटल्स एनर्जी लिमिटेडच्या ‘लॉयडस् इन्फिनाईट फाऊंडेशन’ आणि सामाजिक संस्था ‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’ अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील तीन शाळांमध्ये “आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रम” सलग तीन वर्षांपासून सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत 3 शाळांमधील एकूण 650 विद्यार्थ्यांना गणवेश आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय सत्राच्या सुरुवातीलाच या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
या उपक्रमात प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुगूस, न्यू इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा व इंदिरा गांधी विद्यालय पडोली या शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला. अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे योग्य गणवेश, शालेय साहित्य आणि क्रीडा साहित्यापासून वंचित राहतात. या गरजू विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून दोन्ही संस्थांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. शालोपयोगी साहित्यांच्या अभावामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन होते.
यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गणवेशासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला चालना देण्यासाठी विविध प्रकारचे क्रीडा साहित्यही देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व लॉयडस् इन्फिनाईट फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दोन्ही संस्थांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होतो. या मदतीमुळे विद्यार्थी अधिक उत्साहाने शाळेत येतील.”
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, भविष्यातही अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम सुरू ठेवण्याची ग्वाही दोन्ही संस्थांनी दिली. कार्यक्रमाप्रसंगी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापिका व शिक्षक वृंदांसोबत लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक दीपक साळवे, CSR अधिकारी अनुराग मत्ते, कु. स्नेहा रणदिवे यांच्यासह लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट चे समन्वयक मुकेश भोयर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here