
नम्रता सरदार मुख्य संपादिका – विविध राज्यांतून व महाराष्ट्रातील विविध भागांतुन कर्करोग रुग्ण नागपूरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. तेव्हा उपचारादरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसमोर नागपूर येथे राहण्याचा व जेवणाचा मोठा यक्षप्रश्न उभा राहतो. अशा रुग्णांसाठी “इंटास फाउंडेशन” अंतर्गत नागपूरातील तपश्चर्या नगर येथे निःशुल्क पध्दतीने “अपना घर” चालविण्यात येते. याठिकाणी रुग्ण व समवेत एका नातेवाईकाला उपचार कालावधीत राहण्याची, जेवणाची व रुग्णालयापर्यंत ने-आण करण्याची निःशुल्क पणे सोय करण्यात येते.
या अपना घर मध्ये राखी सणाचे औचित्य साधून नुकताच कर्करोग रुग्ण व त्यांच्यासमवेत राहणाऱ्या नातेवाईकांसाठी राखी सण साजरा करण्यात आला. हे रुग्ण उपचार घेत असतांना कुटुंबापासून दुर आहेत. तेव्हा मानसिकदृष्ट्या त्यांच मनोबल वाढाव यासाठी हा सण याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
याठिकाणी राहत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी स्वहस्ते बनवलेल्या राख्या एकमेकांना बांधून हा सण साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रम “अपना घरच्या” समुपदेशिका प्रवीणा गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, “इंटास फाउंडेशन” अंतर्गत चालविण्यात येणारे “अपना घर” हे केवळ एक आश्रयस्थान नाही तर एक कुटुंब आहे. येथे रक्षाबंधन साजरे केल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवेसोबतच मानसिकदृष्ट्या भावनिक उपचार मिळून रुग्णांच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते. रुग्णाला एकाकीपणा न भासता आपलेपणाची जाणीव निर्माण होते. म्हणूनच आम्ही हा उपक्रम राबविला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमानंतर उपस्थितांना मिठाईचे वितरण करण्यात आले. रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी व आनंद आणण्यासाठी यावेळी संवादात्मक सत्र देखील आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्तिक सहारे, आदीत्य पोटरूंगे, माला चट्टे यांसह अपना घरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.















