
चंद्रपूर :- दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या डायल ११२ वाहनावरील मार्शल पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे बामणी टी-पॉईंट, कोठगीर रोड येथे नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, पांढऱ्या रंगाची बलेनो कार (क्र. MH-34 CJ-2477) संशयितरित्या येताना दिसल्याने तिला थांबवून पंचासमक्ष तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान कारमध्ये देशी दारु “रॉकेट संत्रा” कंपनीच्या २५ पेट्या (प्रत्येकी १०० बॉटल, ९० एम.एल.), किंमत सुमारे १,००,००० रुपये तसेच ऑफिसर चॉईसवि देशी दारुच्या २ पेट्या (प्रत्येकी १०० बॉटल, ९० एम.एल.), किंमत १४,००० रुपये विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरण्यात आलेली बलेनो कार, किंमत सुमारे ५,००,००० रुपये मिळून एकूण मुद्देमाल ६,१४,००० रूपये जप्त करण्यात आला.
वाहन चालक सुदर्शन शंकर दासरी (वय ३८ वर्ष, रा. गडचांदुर) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, बल्लारपूर पो.नि. बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, पोहवा परमीवीर यादव, सौरभ मुन आदींनी केली















