
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड
पालघर दिनांक 3 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत “आदि कर्मयोगी” या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान केवळ एक योजना नसून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठीची ऐतिहासिक चळवळ आहे.आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्या मधील 654 गावांमध्ये आदी कर्मयोगी अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
आदि कर्मयोगी अभियानांतर्गत एकदिवसीय अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, डॉ.अपूर्वा बासुर, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई, विजया जाधव ,मांडवी वनसंरक्षक अमित भोसले , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, बन्सीलाल पाटील, राजेंद्र पाटील, तसेच जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
झारखंडमधील हजारीबाग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील दूर्वेस-मनोर येथून या अभियानाच्या माहिती, शिक्षण व संवाद (IEC) महिमेचा शुभारंभ करण्यात आला. आदि कर्मयोगी अभियानाचा मुख्य हेतू तळागाळामधील नेतृत्व निर्माण करणे, शासकीय सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या दिशेने आदिवासी समाजाला सक्षम करणे ,
प्रत्येक गावासाठी ‘ग्राम व्हिजन २०३०’ आराखडा तयार करणे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
या अभियानाची अंमलबजावणी तीन महत्त्वाच्या गटांद्वारे होणार असून या मध्ये
1.आदि कर्मयोगी – शासकीय अधिकारी
2. आदि सहयोगी – शिक्षक, डॉक्टर, व्यावसायिक मार्गदर्शक
3. आदि साथी – स्वयंसेवक, महिला बचतगट सदस्य, आदिवासी नेते, सेवाभावी संस्था, ASHA कार्यकर्त्या यांचा समावेश असणार आहे.
पालघर जिल्ह्यात या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू असून.
६५४ गावे व ८ तालुक्यांत ३९६ कॅम्पस द्वारे
एकूण ५४,७७५ लाभार्थ्यांना पायाभूत सेवा (आधारकार्ड, बँक खाते इ.) पोहोचविण्यात यश आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
९ जिल्हास्तरीय (मास्टर ट्रेनर्स) स्थानिक बदल एजंट यांना तळागळातील पोहोच वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल . जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४० अधिकारी (ब्लॉक-लेव्हल ) यांचाही समावेश असणार आहे.
या अभियानामुळे सरकार व आदिवासी समाज यांच्यातील विश्वास अधिक दृढ होणार आहे. युवक आणि महिलांना नेतृत्वाची संधी मिळेल, स्थानिक समस्यांवर गावकऱ्यांसोबत उपाय शोधले जातील तसेच शासकीय योजना दुर्गम भागात अधिक प्रभावीपणे पोहोचतील.
आदि कर्मयोगी अभियान” हे सेवा, संकल्प आणि समर्पण या मूल्यांवर आधारित असून आदिवासी समाजाच्या विकासाला चालना देणारी एक क्रांतिकारी चळवळ ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
सेवा, समर्पण आणि संकल्प या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धती
केंद्र, राज्य, जिल्हा व पंचायत स्तरावर प्रतिसाद गट तयार करून योजनांचे कन्व्हर्जन व एकात्मिक विकास साधणे
प्रत्येक स्तरावर नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
तालुका मास्टर ट्रेनर नियुक्त करून जिल्हा प्रोसेस लॅब गठीत करून ग्राम कृती आराखडे (Village Action Plan) तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी संबंधित विभागाला दिल्या
अभियान मिशन मोडमध्ये राबविण्याचा निर्धार
‘आदी कर्मयोगी’ अभियानाद्वारे सरकारी अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि स्थानिक नेते एकत्र येऊन आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतील. वितरणातील तफावत भरून काढणे, ग्राम दृष्टीकोन २०३० आराखडे तयार करणे, स्थानिक संस्कृती व भाषांचे संवर्धन करणे आणि सरकार व समाज यांच्यातील विश्वास दृढ करणे हे अभियानाचे प्रमुख हेतू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी यांनी सांगितले की, “आदी कर्मयोगी अभियान हे केवळ योजना नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. पालघर जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी बहुल गावामध्ये या उपक्रमाचा ठसा उमटवला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून एकदिवसीय अभिमुखता कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी स्टेट प्रोसेस लॅब, नाशिक येथे प्रशिक्षित झालेले जिल्हा मास्टर ट्रेनर यांची ओळख करून देण्यात आली. तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची माहिती सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. नाशिक येथे २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या प्रशिक्षणाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी घेतला.















