prabodhini news logo
Home चंद्रपूर होतकरू विद्यार्थ्यांचे मार्गदाता : पहाडी हिरे प्राचार्य डॉ.संभाजी वारकड

होतकरू विद्यार्थ्यांचे मार्गदाता : पहाडी हिरे प्राचार्य डॉ.संभाजी वारकड

0
140

ज्ञान, संस्कार, व्यासंग आणि मूल्यांचा दीप प्रज्वलित ठेवत, विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश पेरणारे आदरणीय प्राचार्य डॉ. संभाजी वारकड सर यांचा आज ९ सप्टेंबर वाढदिवस म्हणजे खरं तर आमच्यासाठी ज्ञानाचा उत्सवच आहे.शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान हे केवळ महाविद्यालयापुरते मर्यादित नसून, ते समाजाला दिशा देणारं आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उभारलेला मार्ग आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शैक्षणिक प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता, आणि प्रत्येक कार्यात सकारात्मक दृष्टिकोन या त्यांच्या गुणांमुळे ते सर्वांचे लाडके झाले आहेत.वारकड सरांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे सौजन्य, परिश्रम आणि दूरदृष्टीचा सुंदर संगम आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जात आहेत आणि समाजात आपलं स्थान निर्माण करत आहेत. सायासाने असाध्य ते साध्य करीत ज्ञानज्योतीच्या प्रज्वलनाने असंख्य विद्यार्थी घडविणारे, आचारविचाराच्या तत्त्वातून मूल्य रुजवीत जगण्यातून जीवनादर्श निर्माण करणारे प्रांजळ व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्राचार्य वारकड सर होय.सरांच्या कार्यक्षमतेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा प्राप्त झाले असल्यामुळे त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे दिशादर्शक स्वरूपाचे आहे.

जीवनप्रवासात विलक्षण कार्यकर्तृत्वाने प्रभावित करणारे , दिलखुलासपणामुळे कायम स्मरणात राहणारे सदाबहार व्यक्तिमत्व म्हणजे सर.सतत काम करण्याची हातोटी, प्रचंड परिश्रम घेण्याची प्रवृत्ती आणि कशाही स्थितीत नाउमेद न होता गड सर करण्याची जिद्य या सर्व गोष्टी ज्यांच्यात अंतर्भूत आहेत असे प्रांजळ, परिश्रमी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्राचार्य डॉ. संभाजी वारकड सर होय.
प्राचार्य संभाजी वारकड सरांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेमळ, मनमिळावू , समंजस, निरंहकारी, कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टीचे आहे. त्यांचा जीवनप्रवासही तसा खडतरच.बालपण जिवती सारख्या अतिदुर्गम भागात गेले. घरातील वारकरी संप्रदायाचा प्रभाव त्यांच्यावर पडला असल्यामुळे सर्व मंगल मांगल्याचीच भावना जोपासत सर्वतोपरी गरजूंना मदत करण्यासाठी ते तत्पर असतात. सांप्रदायिकतेमुळे नैतिक आचरण शुद्ध आहे. प्रेमळ, दिलखुलास, प्रभावी रुबाबदार असे राजबिंडे व्यक्तिमत्व सरांना लाभले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे जन्म, जिवतीत शेतकरी कुटुंबात बालपण, आश्रम शाळेत दगडा – धोंड्यातून, जंगलाच्या काट्याकुट्याचा रस्ता तुडवीत सुरू झालेला त्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास आजच्या भौतिक सुखाने आळसावलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायीच. उच्च शिक्षण दिवंगत बाबा आमटे यांच्याकडे ते ज्ञानाचे आगार असलेल्या नामवंत उदयगिरी महाविद्यालय येथे झाले.त्यांचा शैक्षणिक आलेख दिवसेंदिवस उंचावतच राहिला. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कायम प्राविण्य प्राप्त केले. इंग्रजी सारख्या कठीण विषयात एम.ए. च्या अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून गुणवत्ता यादीत येण्याचा मान त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन मिळविला. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग द्वारा आयोजित इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केली. शिवाय तामिळनाडू राज्यातून इंग्रजीमध्ये एम फिल व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून इंग्रजी विषयात पीएचडी ही आचार्य पदवी संपादन केली.प्रारंभी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक ,त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय कोरपणा येथे प्राचार्य व आता श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे प्राचार्य असा शिक्षक ते प्रशासक, अध्यापन ते व्यवस्थापन सुरू झालेला त्यांचा देखणा प्रवास निश्चितच प्रशंशनीय.सतत कार्यमग्न असणारे व्यासंगी ,परिश्रमी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रा. संभाजी वारकड यांनी सरदार पटेल महाविद्यालयांमध्ये अल्पावधीतच वेगळा ठसा उमटविला. दहा वर्ष सातत्यपूर्ण अध्यापनाने आणि प्रभावी संभाषण कौशल्यामुळे ते कायम विद्यार्थी प्रिय व कर्मचारीप्रिय राहिले. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विविध पुरोगामी संघटनात सक्रिय काम करीत समाजातील गरीब, उपेक्षित, होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात सर नेहमी अग्रेसर असतात . लाडके व लोकप्रिय आमदार श्रीमान देवराव भोंगळे, नामदेव देवकते ,प्राचार्य डॉ पांडुरंग सावंत यासारखे अनेक विद्यार्थी सरांचे गौरवाने आजही नाव घेतात. कोणाचाही द्वेष, मत्सर न करता हेवा , असूया न ठेवता सहानुभवाने सौजन्यपूर्ण व्यवहार करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजेच प्राचार्य संभाजी वारकड सर होय.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली स्थापनेनंतर इंग्रजी भाषा अभ्यास मंडळ, त्यानंतर विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आले त्यानंतर अकॅडमी कौन्सिल, विज्ञान व तंत्रज्ञान भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमचे सहसचिव, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य तसेच कै. बापूजी पाटील मामुलकर स्मृति प्रतिष्ठानचे संचालक अशा विविध प्राधिकरणावर प्रभावी आणि यशस्वीपणे कार्यरत आहे. इंग्रजी विषयात अकरा पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवी प्राप्त केली आहे व सध्या सहा विद्यार्थी आचार्य पदवी प्रबंधाचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनात करीत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शोधनिबंध व डझनभर पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा सेमिनार व परिषदा त्यांनी कोरपना व राजुरा येथील महाविद्यालयात यशस्वीपणे आयोजित करून महाविद्यालयाचा संपर्क जगभरातील बऱ्याच देशाशी स्थापन केलेला आहे.ग्रामीण भागातल्या होतकरू विद्यार्थ्यांना विविध शासकीय नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील .त्यासाठी कोणते परिश्रम घ्यायला हवे, याविषयी सर सदोदित प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करतात. त्याचेच फलित म्हणजे माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम जिवती तालुक्यातील गरीब ,होतकरू विद्यार्थ्याकरिता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती तालुका सर्वव्यापी सेवा फाउंडेशनची निर्मिती झाली .त्यातून चंद्रपुरात तुकुम येथे मोफत अभ्यासिका चालविली त्यातून चार महिन्यात तब्बल २४ विद्यार्थी विविध शासकीय सेवेत लागले. अशा सामाजिक कार्यात सर नेहमी पुढाकार घेतात.

राजुरा येथे शिवाजी महाविद्यालयात विविध नाविन्यपूर्ण कोर्सेस आणून महाविद्यालयाचे प्रगती केली , त्यात सरांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.. राजुरा बस स्थानकासमोर चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले मुख्यमंत्री मा.सा.कन्नमवार यांच्या नावाने व बल्लारशा पेपर मिल च्या मदतीने वाचनालय सुरू करण्यात सरांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. मागील दोन वर्षात सदर वाचनालयातून 29 विद्यार्थी एमपीएससी पासून विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेले आहेत जिवती गावातील लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी वारकऱ्यांकरिता उभारलेले विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर म्हणजे
सांस्कृतिक संचिताचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी घेतलेला पुढाकारच.सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या अंगाने सर नेहमी कार्य करतात. स्वतः प्रतिकुलतेवर मात करीत उच्च शिक्षण घेऊन ते नोकरीवर रुजू झाले .किंबहुना महात्मा फुले- सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्नीला उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून यशस्वी अध्यापिका बनविले. होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास कायम मनी बाळगत या उपजत झऱ्यांना मोकळे करुन विकसित करता येईल, यासाठीचे सरांचे प्रयत्न अहोरात्र सुरू असतात.

प्रयत्नपूर्वक स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून आपल्यासारख्या धडपडणाऱ्या अनेकांना विविध संधी उपलब्ध कशा होतील व त्यांनाही स्वावलंबी कसे होता येईल, या ध्यासाने प्रयत्नरत असतात. जिवती तालुक्याकरिता ते आदर्श असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. तालुक्यातील. प्रा .राजकुमार मुसणे , डॉ.माधव कांडनगिरे, प्रा.ज्ञानेश्वर गिरमाजी , प्रा.तुकाराम गिरमाजी, प्रा.महेश देवकते ,प्रा. चेतना चव्हाण, रमेश राठोड असे कितीतरी व्यक्ती प्राचार्य संभाजी वारकड यांना प्रेरणास्थानी मानतात.जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात सरांचा सल्ला अवश्य घेतात.आज डॉ . वारकड सर वयाचे एक्कावन्न वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही सतत बारा तास एका जागी बसून कार्य करण्याची त्यांची क्षमता वाखाण्ण्यासारखी आहे. अर्थातच तरुणांनाही लाजवेल असे उत्साही व सदाबहार व्यक्तिमत्व त्यांचे आहे. प्रेमळ, उत्साही अशा प्रा. अंजली वारकड या अर्धांगिनी , उच्च शिक्षण घेत असलेला चि.आदित्य व गुणवंत श्रीनिवास हे दोन अपत्य आणि इतर बराचसा गोतावळा आहे. विविध अंगी भूमिका समर्थपणे पेलत सतत कार्यमग्न असणाऱ्या आमचे मार्गदर्शक गुरूतुल्य ज्येष्ठ बंधू प्राचार्य डॉ. संभाजी वारकड सरांना एकावन्नव्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तथा पुढील भावी निरामय अशा उज्वल आयुष्याच्या मनःपूर्वक सदिच्छा..!
ज्ञानप्रकाशाचा हा दिवा अधिकाधिक तेजाने प्रज्वलित होवो, आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रवास नवनव्या उंचीवर पोहोचो, हीच प्रार्थना!

दिवे सोडतो प्रवाही उजळो आकाश आकाश,
सर तुमच्या जीवनात नांदो सदा प्रकाश प्रकाश !

प्रा. डॉ. राजकुमार मुसणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here