
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासोबत सेवा पंधरवडा, स्वच्छता ही सेवा, स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान, हरित महाराष्ट्र अभियान व राष्ट्रीय पोषण माह या अभियानात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा”- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
मोजिस परमार विशेष जिल्हा प्रतिनिधी ठाणे – दि. १६ : ग्रामीण विकास व पंचायत राज प्रणालीला बळकटी देणे, नागरिकांना शासनाच्या सेवा थेट उपलब्ध करून देणे, आरोग्य व पोषण जनजागृती वाढविणे तसेच स्वच्छता, लोकसहभाग यावर आधारित विविध राज्य व केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानांची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषद आज, दि. १६ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान*
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी माहिती देताना सांगितले की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना कामगिरीनुसार प्रोत्साहित करून समृध्द ग्रामीण भाग करण्यासाठी अभियान राबविले जात आहे.
सन २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य या चार स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना पुरस्कार दिले जाणार आहेत. या अभियानात सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ गाव, सामाजिक न्याय, उपजीविका विकास, लोकसहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या प्रमुख घटकांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
अभियानाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
1. विकसित महाराष्ट्र २०४७ करिता पंचायत राज संस्था अधिक गतीमान करणे.
2. ग्रामपंचायतींमध्ये विकासाची निकोप स्पर्धा घडविणे.
3. अभियान कालावधी : १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५.
4. विकासाला लोकचळवळीचे स्वरूप देणे.
5. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे.
6. पुरस्कारासाठी एकूण तरतूद : २४५.२० कोटी रुपये
7. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्तरावर मिळून एकूण १,९०२ पुरस्कारांचे वितरण.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रधान सचिव (भा.प्र.से) एकनाथ डवले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत, बांधकाम, शिक्षण, महिला व बाल कल्याण, पशुसंवर्धन, DRDA, MSRLM, महसूल, कृषि, समाजकल्याण, आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, जलसंधारण, मनरेगा अशा विविध विभागांचा सहभाग घेऊन तालुकास्तर व ग्रामस्तरावर विविध पुरस्कार मिळविण्यासाठी संबधित यंत्रणेमार्फत योग्य कार्यवाही केली जाणार आहे.
जिल्हा स्तरावरील अभियान शुभारंभ ग्रामपंचायत खोणी, पंचायत समिती कल्याण येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच १७ सप्टेंबर, २०२५ रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे शुभारंभ होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मा. खासदार व मा. आमदार त्यांच्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून अभियानाचे शुभारंभ करणार आहेत.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान” अंतर्गत वृक्षारोपण, शाश्वत हरितीकरण, जलसंधारण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे. स्थानिक संस्था, शाळा, स्वयंसेवी संघटना आणि ग्रामस्थांचा या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग राहील.
राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत वर्ष २०२५ मध्ये १० कोटी वृक्ष लागवड लोकचळवळ उभी करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने, ग्रामविकास विभागाच्या दि. २८ जुलै, २०२५ च्या शासन निर्णयानुसार एकूण १ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी ठाणे जिल्हा परिषदेस १,५४,३०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ रोजी एकत्रित वृक्षारोपण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
सेवा पंधरवडा
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) अविनाश फडतरे यांनी सांगितले की, भारत सरकारतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा केला जातो. यामध्ये आरोग्य शिबिरे, पोषण उपक्रम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान तसेच शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व संस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे.
स्वच्छता ही सेवा
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पा.पु.) पंडित राठोड यांनी स्पष्ट केले की, या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा अभियानाची थीम “स्वच्छोत्सव” असून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान हा पंधरवडा राबवला जाणार आहे.
यामध्ये स्वच्छता लक्ष युनिट्स (CTUs) स्थापन करून अस्वच्छ ठिकाणांची साफसफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे, “एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रमाअंतर्गत २५ सप्टेंबर रोजी महाश्रमदान तसेच विशेष ग्रामसभेद्वारे स्वच्छ सुजल गाव घोषीत करणे यांचा समावेश आहे.
स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” राबवले जाणार आहे.
यामध्ये महिलांची सर्वांगीण आरोग्य तज्ञ डॉक्टर मार्फत वैद्यकीय तपासणी, कर्करोग व मधुमेह निदान, माता व बाल संरक्षण कार्ड वितरण, लसीकरण, मासिक पाळी स्वच्छता व पोषण सत्र, क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी “निक्षय मित्र अभियान”, तसेच रक्तदान शिबिरे यांचा समावेश असेल. आभा (ABHA) कार्ड व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PM-JAY) नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राष्ट्रीय पोषण माह
महिला व बालकल्याण अधिकारी श्री. संजय बागुल यांनी सांगितले की, यावर्षी १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान “राष्ट्रीय पोषण माह” साजरा होणार आहे.
लठ्ठपणा नियंत्रण, पोषण भी – पढ़ाई भी, एक पेड माँ के नाम, बालक आहार पद्धती, Men-Streaming आणि Vocal for Local या सहा प्रमुख थीम्स अंतर्गत विविध कार्यक्रम जिल्ह्यात राबवले जातील. विशेषतः स्थानिक आहाराला प्रोत्साहन, तृणधान्ययुक्त पदार्थांचा प्रसार, पोषण वाटिका, महिला कलाकारांना व्यासपीठ आणि बालकांच्या पोषणाविषयी जनजागृती या गोष्टींवर भर दिला जाणार आहे.
या सर्व अभियानांचा उद्देश ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींमार्फत लोकसहभागातून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणे, स्वच्छता, आरोग्य, पोषण, पर्यावरण व ग्रामविकास यांचा समन्वय साधणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे असून ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थांना या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.















