
धम्म चक्र पाली भाषेत व संस्कृत मध्ये धर्म चक्र हे बौद्ध धर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीक चिन्ह आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिन्ह आहे. प्रगती व जीवनाचे सुद्धा प्रतीक आहे.
वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम यांना ज्ञान प्राप्ती झाल्या त्यानंतर “बुद्ध” म्हणून ओळखले गेले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे, तर ज्ञानाची अवस्था आहे. ज्ञान प्राप्ती नंतर बुध्दांनी सारनाथ (उ. प्र.) येथे पाच भिकून्ना जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्म चक्र प्रवर्तन म्हटले जाते. या पहिल्या उपदेशात त्यांनी बौद्ध तत्व मांडली.
भगवान बुध्दांच्या काळात इ. स. पू. पहिल्या सहस्राब्दी च्या मध्यात गंगा खोऱ्यात दिसू लागले. चक्र हे बुध्दांच्या नैतिक संहिता आणि त्यांच्या शिकवणींचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आले. चाकाच्या मध्यभागी तीन चक्रे आहेत जी बौद्ध धर्माच्या तीन रत्नाचे प्रतिनिधित्व करतात.
बुद्ध – बुद्ध शिक्षक/ज्ञानी
धम्म – बुध्दांची शिकवण
संघ – समुदाय
बुद्धानी त्यांचे प्रवचन देतांना “धर्माचे चाक” गतिमान केले असे म्हटले आहे.
धम्म चक्राचे आठ आरे तथागत बुद्धानी सांगितलेली अष्टांगिक मार्ग दर्शवितात.
आठ अंग – ( सम्यक = योग्य)
सम्यक दृष्टी
सम्यक संकल्प
सम्यक वाचा
सम्यक कर्मात
सम्यक आजीविका
सम्यक व्यायाम
सम्यक स्मृती ( जागरूकता)
सम्यक समाधी ( ध्यान /एकाग्रता)
या मार्गाने व्यक्ती आपल्या मनातील अशुद्धता दूर करणे आणि खऱ्या आत्मज्ञानाकडे वळते. त्याला दुःख आणि क्लेशपासून मुक्ती मिळते.
धम्म चक्र गतिमान करणे म्हणजे बौद्ध धम्माचे तत्वज्ञान आणि शिकवण पुन्हा सक्रिय करणे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायासह बौद्ध धम्म स्वीकारून केले याला धम्म चक्र प्रवर्तन म्हणतात, जे एका क्रांतीकारी बदलाचे प्रतीक आहे. जिथे बुद्ध तत्वज्ञानानुसार जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारून अमानवी प्रथाचा त्याग केला आहे. या दिवशी बौद्ध धम्माचे चक्र गतिमान केले गेले म्हणजे लुप्त होत असलेला बौद्ध धम्म नव्याने पुन्हा सुरू केला / गतिमान केला.
धम्म चक्र प्रवर्तन म्हणजे केवळ धर्मांतर नव्हे तर, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा स्वीकार करणे, आणि मानव मुक्तीच्या नव्या युगाची सुरुवात करणे होय.
धम्म – याचा अर्थ बुद्धानी दिलेला मार्ग.
चक्र – हे बुद्धाच्या शिकवणीचे प्रतीक आहे, जे परिपूर्णता आणि नैतिक शिस्त दर्शवते. हे चाक फिरविणे म्हणजेच त्या मार्गांवरून चालण्याचा संकल्प करणे.
प्रवर्तन – (गतिमान करणे) ही प्रक्रिया प्रक्रियेला गती देवून तिला कार्यान्वित करण्याची क्रिया आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी नागपूर ही बौद्ध धर्मीय नागलोकांची भूमी म्हणून धर्मांतरासाठी नागपूर दीक्षा भूमी ची निवड केली.
कलिंगाचे युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी सम्राट अशोकांनी शस्त्र खाली ठेवून, शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्वे असलेल्या महान असा बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी स्वतःवर विजय मिळवला म्हणून या दिवसाला ” विजयादशमी ” असे म्हणतात म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी च्या दिवशी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्म स्वीकारला आणि बौद्ध धम्माचे चक्र गतिमान केले म्हणूनच या दिनाला ” धम्म चक्र प्रवर्तन दिन ” असे म्हणतात.
बौद्ध धार्मियांचे दुर्भाग्य की डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी हे धम्म चक्र प्रवर्तन केले / गतिमान केले आणि त्या नंतर अवघ्या ५० दिवसात म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले…
हे धम्म चक्र बौद्ध अनुयायीनी आजही गतिमान ठेवले आहे.
भारतातून लाखो बौद्ध अनुयायी या दिवशी दीक्षा भूमी नागपूर येथे येऊन हा दिवस सण म्हणून साजरा करतात. जगातले सर्वात मोठे धर्मांतर सोहळयाची आठवण जल्लोष्यात साजरी केली जाते.
सुनंदा पुरुषोत्तम ढिवरे (सुनंदा निकम)















