
माणसाला जगायला रोजच पैसा हवा असतो.दूध, भाज्या,तांदूळ, गहू, डाळी, तेल आणि इतर किराणा दुकानातील पदार्थ, फळं, कपडा. लत्ता आणि बरंच काही.
ज्या घरात आपण रहातो, ते विकत घेणं किंवा त्या घराचं भाडं,इलेक्ट्रिसीटी, पाणी आणि इतर आवश्यक गोष्टींवरील वेगवेगळे कर, बीलं भरणं. डागडुजी करणं.देखभाल करणं.
कामानिमित्त जर घराबाहेर पडायचंच तर रिक्षा, बस, टॅक्सीसाठी पैसे.
बाहेरचं,हाॅटेलमधील दिवसातून एकदातरी होणारं खाणं.
घरात मदतीला येणारी माणसं,धुणं, भांडी, लादी पुसणं, स्वयंपाक बनवून देणं आणि इतर कामांसाठी येणाऱ्यांना त्यांच्या कामाचा दिला जाणारा पगार, मोबदला.
पैसे जसे गरजेचे तशीच प्रेम करणारी , सुश्रूषा करणारी , घरात मदत करण्यास येणारी माणसं जपावी लागतात.मग पैसे द्यावे लागतात,तेही आपली मदत होते म्हणूनच ना.
नात्यातली, जवळची माणसं निरपेक्षपणे मदत करत असतात,कारण ते नातं प्रेमाने जुळून आलेलं असतं.
केबल ,टि.व्ही.,गिझर,गॅस _ सिलेंडर ,ए.सी.,मोबाईल, मिक्सर, मायक्रोवेव्ह आणि इतर वस्तू ह्या गरजेच्याच. घ्याव्या तर लागतातच.
बिघडल्या तर पुन्हा घ्याव्या लागतात.
गाडी. तिच्यात पेट्रोल भरण्यासाठी पैसे.
आजारपण काही सांगून येत नाही.अचानक येऊन धडकतं. शरीरावर, मनावर,पैशांच्या नियोजनावर. . … ..
घराबाहेर गेलं की जातोच पैसा , पण घरात बसूनही पैसे जातातच.
अंडीवाला, इस्त्रीवाला, पेपरवाला , … ..
पैशांची तरतुद आधीच करून ठेवलेली बरी असते.
पैसे बॅकेत तसेच जवळही असावेच लागतात.
मुलांच्या शाळेसाठीचा खर्च तर बराच मोठा आणि वर्षभर चालूच असतो.
त्यांचे संगोपन करताना ,उत्कर्ष _ विकासाकडे वाटचाल होताना पैसे जपून वापरावे लागतात.
आयुष्यभर पैसे कमवावे तर लागतातच.
पैशांनी मोठं होण्यापेक्षा, पैशांनी निश्चिंत होता येणं महय्वाचं असतं.
म्हणूनच आयुष्यात पैशांचं नियोजनही शिक्षण, करियर यांच्या रांगेत नेऊन बसवावं लागतं.
मन ,विचार हेही योग्य दिशेने वाटचाल करत राहिले,आरोग्य सांभाळता आले कि यश,प्रगतीच्या दिशेने जात हसत,खेळत जगणं शक्य होतं.
डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे.
ठाणे.















