
नाशिक – १३ नोव्हेंबर २०२५ नाशिक जिल्ह्यात विकासाचा नवा टप्पा गाठणारा एक ऐतिहासिक सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष प्रसंगी उपस्थित होतो.
नाशिक जिल्हा परिषदेची ही नवीन इमारत राज्यातील सर्वात मोठी, आकर्षक आणि अत्याधुनिक सुविधांनी सजलेली इमारत म्हणून विशेष ओळख मिळवत आहे. सुबक बांधकाम, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकाभिमुख रचना यामुळे सर्वसामान्यांसाठी अधिक गतिमान, पारदर्शक आणि सोयीस्कर प्रशासन उपलब्ध होणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना येथे सेवा मिळणे अधिक सुकर होणार आहे.
यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या “Roots of Change – नाशिकच्या ग्रामीण महिला उद्योजिकांच्या यशोगाथा” या प्रेरणादायी मासिकाचे प्रकाशन केले. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या मेहनतीने आणि उद्योजकतेने मिळवलेल्या यशोगाथांचा हा संग्रह असून, महिलांना नवीन दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी विकासाचा नवा अध्याय सुरू करणारा हा दिवस ठरला.
या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.















