
चेंबूर येथे बौद्ध संवाद दौरा संपन्न
मुंबई : भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील चेंबूर येथील वाशी नाका, सिद्धार्थ बुद्ध विहार, भारत नगर येथे ‘बौद्ध समाज संवाद दौरा’ नुकताच संपन्न झाला.
या संवाद दौऱ्यात वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी बौद्ध समाजा समोरील राजकीय, सामाजिक, आणि धार्मिक आव्हानांवर सखोल चर्चा केली. तसेच, या समस्यांवर मात करण्यासाठी सामूहिक उपाय योजनांवर बौद्ध अनुयायांसोबत प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला.
राजेंद्र पातोडे यांचे महत्त्वाचे आवाहन
मार्गदर्शन करताना राजेंद्र पातोडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “बाळासाहेब आंबेडकर हे तुमचं-आमचं कवच कुंडल आहे. ते जर हटले, तर संविधान, आरक्षण आणि लोकशाही संपवली जाईल. त्यामुळे सामूहिक राजकीय निर्णय घेऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.”
यावेळी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान महासभे’ चे निमंत्रणही बौद्ध अनुयायांना देण्यात आले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महासचिव सतीश राजगुरू यांच्यासह चेंबूर परिसरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















