
सोलापूर – प्रभाग क्र. १५ मधील आळंदकर चाळ परिसरातील रस्त्याच्या समस्येचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत या भागातील काँक्रिट रस्ता विकासकामासाठी ८ लाख ३६ हजार रुपये निधी मंजूर झाला असून, या कामाचे भूमिपूजन त्यांच्याच शुभहस्ते करण्यात आले.
आळंदकर चाळ हा शहराचा मध्यवर्ती आणि लोकवस्तीचा भाग. येथे रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता. पावसाळ्यात चिखल, खड्ड्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असे. आता मंजूर निधीमुळे हा रस्ता मजबूत व टिकाऊ बनणार आहे.
परिसरातील झाडेझुडपे वाढल्याने प्रवेशमार्ग अरुंद झाला होता. भूमिपूजनाच्या निमित्ताने चाळीतील झाडेझुडपांची साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्यात आला, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या भूमिपूजनप्रसंगी माजी नगरसेवक चेतनभाऊ नरोटे, विनोद भोसले, माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे, युवा नेते जॉन फुलारे, काँग्रेस शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, ज्येष्ठ नेते बसवराज म्हेत्रे, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष अँड. मयूर खरात, सुशीलकुमार म्हेत्रे, रुपेश गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ता कामासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे, माजी नगरसेवक चेतनभाऊ नरोटे व माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
संबंधित विभागाला काम निश्चित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन रस्ता तयार झाल्यानंतर वाहतुकीची सोय सुधारेल, पावसाळ्यातील त्रास कमी होतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
आळंदकर चाळ परिसरातील रहिवाशांनी खासदार प्रणिती शिंदे व नगरसेवकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत या विकासकामांचे मनापासून स्वागत केले.















