prabodhini news logo
Home चंद्रपूर नात्यातील गहिरेपणा दर्शविणारे नाटक बाप रे बाप!

नात्यातील गहिरेपणा दर्शविणारे नाटक बाप रे बाप!

0
310

लेखक – प्रा. डॉ.राजकुमार मुसणे

आयुष्यभर संघर्षाने कुटुंबाचा गाडा ओढत मुलांच्या भवितव्यासाठी प्रामाणिकपणे धडपडणाऱ्या आणि जबाबदारीचे ओझे वाहणाऱ्या बापाचे महत्त्व अधोरेखित करणारे सदानंद बोरकर यांचे नाटक म्हणजे बाप रे बाप!
होय! संसारासाठी खस्ता खात तडजोडीने जगणाऱ्या बापाच्या त्यागाचा जराही विचार न करता केवळ स्वतःचे आयुष्य नोकरीच्या माध्यमातून सजविता यावे यासाठी प्रसंगी बापालाही संपविण्याचा विचार करणाऱ्या स्वार्थी पिढीच्या वाईट मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे हे सामाजिक नाटक.
ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद बोरकर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून जन्माला आले आहे.
१६ नोव्हेंबरला लाखांदूर येथे हाऊसफुल गर्दीत प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग प्रत्यक्ष बघण्याचा योग आला.
सदानंद बोरकर यांचं अनुकंपा या अभिनव विषयावरील नवकोरं नाटक, फुल्ल कॉमेडीच्या सादरीकरणामुळे रंगतदार ठरले.
नाविन्यपूर्ण अशा वेगळ्या विषयाने प्रारंभापासून अखेरपर्यंत भन्नाट कॉमेडीमुळे प्रेक्षकांची पकड धरत गतिमानतेने सरकणारे हे नाटक आनंददायी स्वरूपाचे.
नोकरीसाठी मिळेल तो मार्ग स्वीकारून आटापिटा करणाऱ्या बेरोजगारांची व्यथा मांडत विदारकता दर्शविणारे हे नाटक . “बाप हा प्रत्येक मुलाच्या स्वप्नाचा पहिला रक्षक असतो. तो संकटाच्या आगीत उभा राहून लेकराला सावली देतो” हा भावनिक संदेश या देणारे आहे. नात्यातील विविध पदर मिश्किलपणे उलगडत नाटकातून वास्तविकता मांडण्याचा नाटककाराचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.
अनुकंपेच्या माध्यमातून नोकरी मिळवण्यासाठी मुलाने बापाला विष दिल्याने बापाचा मृत्यू होतो असे गृहीत धरलेल्या प्रेक्षकांना मात्र नाटककाराने अनपेक्षित चांगलाच धक्का देत सरतेशेवटी अप्रतिम सामाजिक संदेश दिलेला आहे.
या नाटकातील बबली मावशी हे पात्र छोटेसे असले तरी संवादागणिक प्रेक्षकांना हसविणारे आणि रंगत वाढविणारे गमतीदार अन मजेशीर आहे. विशेष म्हणजे या नाटकातील पात्रांच्या मिश्किल स्वाभाविक संवादातून होणाऱ्या विनोद निर्मितीमुळे प्रेक्षकांना नाटक संपेपर्यंत कुठेही बोर होऊ देत नाही.
सायलेन्सर , मनोरंजन, सर्कस , सेकंड हॅण्ड ,घानमाकड, बैताड मेहुणी, बातमीसाठी दिवे लावणे ,सर्कशीतल रिंग मास्टर, फिफ्टी फिफ्टी अशा द्विअर्थी विशेषणामुळे प्रसंगातील झणझणीत कॉमेडीच्या तडक्याने प्रेक्षक खळखळून हसतो.

घरातील सामंजस मात्र निपुत्रिक सुनेकडे पाहण्याचा कजाग सासूचा दुय्यम दृष्टिकोन, सावत्रपणाची जाणीव , नात्यातील अंतर अशा अनेक विषयांना कवेत घेत उत्तम नाट्य सादर होते.
प्रसंगानुरून स्त्रियांची भिन्न भिन्न रूपे या नाटकातून साकार होतात.
प्रकाश (मुलगा) च्या भावनिक कवितेतून खरा हिरो म्हणजे आपला बाप असल्याचे सुचविले आहे.
“जगातील कोणतीही ताकद बापाला संपवू शकत नाही, रोज हजारो काट्यावर तो चालतो, फक्त मुलाच्या पायाखाली गुलाबाचे गालीछे अंथरावेत म्हणून तो स्वतःच्या स्वप्नांना तिजोरीत बंद करुन ठेवतो आणि मुलाच्या स्वप्नांना तो पंख देतो.” अश्या मौलिक संवादामुळे बापाच्या कर्तृत्वाची उंची महान झालेली आहे.
बापाच्या ५७ व्या वाढदिवसाचा हर्ष, उत्सव अधिक मनोरंजक असून त्यात सामील सर्वच पात्रानी आपापल्या कलांचे सादरीकरण करुन रंगत आणलेली आहे.
वेळेचे भान, कौटुंबिक नाट्याशय,प्रसंगानुरूप साजेसे नेपथ्य, पात्रानूरूप वेशभूषा, मिश्किल संवाद, जबरदस्त संवादफेक ,नेमकेपणा आणि गतिशीलता यामुळे उत्तम *बापरे बाप!* या सुखात्मिकेचा नाट्यरसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला.
साजेसे नेपथ्य आणि सुंदर पार्श्वसंगीताने सजलेल्या ह्यां नाटकात सातपुतेचा जिगरी आणि लंगोटी यार, अविवाहित मात्र रोमँटिक डॉ. सुळे (कमलाकर कामडी),गंभीर आणि प्रगल्भ मुलगा प्रकाश (पराग सहारे),खट्याळ बबली (देवयानी जोशी), कजाग सासू (पूजा पिंपळकर), कुटुंबवत्सल सून (आसावरी रामेकर),धाकटा मुलगा इंद्रनील (कौशल जोशी ),स्लो मोशन नोकर चमन( राहुल बोरकर) मॅचच्या शेवटी शेवटी येऊन बॅटिंग करून हास्याची फवारणी करणारा बबलू (देवेंद्र लुटे) आणि बापाच्या मुख्य भूमिकेतील अष्टपैलू कलावंत सदानंद बोरकर यांच्या सदाबहार अभिनयाने नाट्यप्रयोग बाप ठरला हे नक्की.
सरतेशेवटी नाटकातील एक प्रमुख पात्र सुळेकाका बापाविषयी आपलं मत मांडताना म्हणतात ते बापाचं ममत्व सिद्ध करणारं आहे.
“जगात आईच्या दुधाचा ऊर पवित्र असतो. पण बापाच्या घामाचा थेंबही त्याहून कमी पवित्र नसतो.”… एवढंच

लेखक प्रा. राजकुमार मुसणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here