
रायगड-अलिबाग,दि.26 :- 26 नोव्हेंबर रोजी देशभरात साजरा होणाऱ्या संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)डॉ.रविंद्र शेळके, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सुनील जाधव यांनी अलिबाग येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले. श्री.शेळके यांनी संविधानातील मूल्ये, महत्व आणि नागरिकांची कर्तव्ये याबाबत उपस्थिातांना मार्गदर्शन केले. तसेच 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत व अधिनियमित करण्यात आली होती. त्यानंतर राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संविधान दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग-वरसोली येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्याख्याते प्रा.गणेश पाटील (पी.एन.पी.महाविद्यालय) यांनी “संविधानातील महत्वाची कलमे व त्यांचा उपयोग” या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना संविधानाची मूलभूत तत्त्वे, अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती दिली.
कार्यक्रमास श्रीमती मोनिका काळे, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी वर्ग-2, श्रीमती माधुरी पाटील, कार्यालय अधीक्षक, श्री.अनिल मोरे, गृहपाल तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.















