
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – ‘संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून भारतीय मूल्यांची खरी ओळख आहे. त्यामुळे सर्वांनी या मूल्यांचा अंगीकार करावा’ असे प्रतिपादन एस. एन. मोर महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य राहुल भगत यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयात नुकताच संविधान दिवस समारोह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. राहुल भगत हे होते. तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजेंद्र बेलोकार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात डॉ. भगत म्हणाले की, ‘भारतीय संविधानातील समता, बंधुता, समाजवाद व धर्मनिरपेक्षता ही मूल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. यांचा अंगीकार प्रत्येकाने आपल्या जगण्यात करायला हवा. असे केल्यास समाजात कोणतेही अराजक निर्माण होणार नाही. आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे संविधानातच दडलेली आहेत.’
या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे सचिन वेरुळकर यांनी केले. सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ रेणुकादास उबाळे यांनी केले तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख राजेंद्र बेलोकार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















