
अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन व वंचित बहुजन महिला आघाडीचा भारतीय स्त्री मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच महानगराध्यक्षा वंदना वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा व महानगर कार्यकारिणीची संयुक्त बैठक पार पडली.
२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे विषमता आणि जातीय अन्यायावर आधारित मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून इतिहास घडवला. भारतीय स्त्री मुक्तीचा मार्ग उजळवणारी ही घटना म्हणून हा दिवस देशभर पाळला जातो. जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि स्त्रीविषयक असमानतेला विरोध दर्शवण्यासाठी या दिवशी विविध ठिकाणी मनुस्मृती दहन कार्यक्रम आयोजित केले जातात.
वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे या निमित्ताने महिला परिषदांचे आयोजन केले जाते. मोठ्या प्रमाणावर महिलांच्या उपस्थितीत विविध ठराव मंजूर करून ते राज्य व केंद्र सरकारकडे पाठवले जातात.
या सर्व नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत जिल्हा व महानगर कार्यकारिणीतील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.















