prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जीवन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जीवन

0
132

जीवन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास. जन्म झाल्यावर मूल रडते… मूल रडते याला आनंद म्हणता येणार नाही… हसण्याला आनंद म्हणता येईल. जेव्हा माणूस मरतो तेव्हा लोक, नातेवाईक रडतात. म्हणजे मरण दुःख आहे, जन्म सुद्धा दुःख आहे, सुरुवातील जेव्हा जीवन सुरू होते, तेव्हा जन्म हा आपल्या जीवनाच्या प्रवासाचा प्रारंभ बिंदू असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास करतांना मार्गात आपण बालपण, तारुण्य, प्रौढत्व, आणि वृद्धत्व असे वेगवेगळे टप्पे अनुभवतो. प्रत्येक टप्पा आनंद, संघर्ष, धडे, यश, अपयश घेऊन येतो. अनुभव हे रस्त्यावरील थांबे आणि वळणे असतात. आपण लोकांना भेटतो, आव्हानांना तोंड देतो. चांगल्याची निवड करतो. चुकांमधून शिकतो. यामधून आपण घडत असतो. मृत्यू हा प्रवासाचा शेवट आहे. ते आपले प्रवासाचे गंतव्यस्थान आहे. प्रत्येक जीवाचा शेवट होतो. सर्व संस्कार अनित्य आहेत. जीवन हे जन्म आणि मृत्यू या मधला काळ आहे. या काळात आपण कसे जगतो, शिकतो, आणि कसे वाढतो हे महत्वाचे ठरते. इतर सर्व प्राण्याबरोबरच मनुष्य जीव आहे. परंतु मनुष्याजवळ मन आहे. माणसाचा विकास होणे महत्वाचे आहे. माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचे नाही पण तो कसा जगला? हे महत्वाचे आहे. माणसाच्या शारीरिक वाढीबरोबरच त्याच्या मनाचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्काराची आवश्यकता आहे. संस्कार आपल्याला अनुभवांचे मूल्यमापन करण्यास, आपल्या वेळेचा सुज्ञपणे वापर करण्यास आणि अडचणींना न जुमानता पुढे जाण्यास प्रोत्साहित करते. थोडक्यात जीवन म्हणजे आपण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत शिकण्याची, वाढीची, विकासाची प्रक्रिया आहे.
तथागत भगवान बुद्धांनी “मानवी स्वभाव व त्याचा आपल्यावर होणारा परिणाम” यावर सुंदर संदेश दिला आहे. एकदा गौतम बुद्धांना विचारण्यांत आले की, मानवाचे कल्याण कशात आहे? यावर तथागतांनी मानवी स्वभावावर मत व्यक्त केले. आपले चित्त हे समोरच्या व्यक्तीने केलेल्या भाषेमुळे विचलित होते. अशा प्रसंगी काय करावे, यावर बुद्धांनी दिलेला संदेश फार लाभदायी आहे. त्यांनी त्यासाठी मानवी स्वभावाच्या चार जोड्या सांगितल्या आहेत.
जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक प्रवास आहे, ज्यामध्ये आपण विविध अनुभव घेतो, शिकतो, वाढतो आणि विकसित होतो. हा एक असा अध्याय आहे ज्यामध्ये सुख-दुःख, किर्ती-अपकिर्ती, प्रेम-वेदना, यश-अपयश यांचा समावेश असतो. सर्व सुख आणि दु:खाच्या प्रसंगात आपले चित्त ढळू न देता आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे.
जीवनाचे काही महत्त्वाचे पैलू:
*लंबोद्योग*: आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे
*संबंध*: आपल्या प्रियजनांबरोबरचे नाते
*अनुभव*: नवीन गोष्टी शिकणे आणि अनुभव घेणे
*वाढ*: स्वतःला सुधारणे आणि विकसित करणे
*आनंद*: जीवनातील छोटे-छोटे आनंद घेणे
जीवन हे एक सुंदर उपहार आहे, त्याचा आनंद घ्यावा.
*माझे जीवन*
माझे जीवन एक साधारण परंतु रोमांचक प्रवास आहे. माझा महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात पिंपळगाव निपाणी या छोट्याशा गावात जन्म झाला, जिथे पावसाच्या थापांनी धरणी हिरवीगार व्हायची, आणि पक्ष्यांच्या किचकिचाटाने सकाळी जाग यायची. माझ्या घरी शेती, बैल, गायी, बकऱ्या, म्हशी, घोडा, कोंबड्या होत्या. त्यावेळी गावात श्रीमंत आणि परस्पर स्पर्धी यालाच म्हणत. गावातील लोकांचे या पलीकडे जग नव्हते. आम्हालाही संस्कारामुळे तसेच वाटे. फार उशीरा समजले की ही साधने आपले उत्थान करू शकत नाही. माझे गाव आजुबाजूनी डोंगरांनी वेढलेले, फुला फळांनी नटलेले होते, गाव दुर्गम भागात होते. पूर्वी पक्के रस्ते नव्हते, दळणवळणाची सोय नव्हती, अनेक वर्ष गावात विज नव्हती, 1975 साली माझ्या घरी वीज नव्हती, तेव्हा मी सातव्या वर्गात शिकत होतो. कंदिलावर अभ्यास केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागले. पाच किलोमीटर पायी चालल्यावर वाहन स्थळ येत होते. तेथुन शहर पन्नास किलोमीटर होते. त्यावेळी घरी सायकल नव्हती, सायकलच्या लायकीचे रस्ते पण नव्हते, आता एक महामार्ग माझ्या गावी माझ्या घराच्या दरवाज्या समोरून गेला आहे. दुसरा समृध्दी महामार्ग समांतर दोन किलोमीटर वरून माझ्या शेतातून गेला आहे. असे असले तरी पुर्वी सारखी विविधता दिसत नाही.
माझे गाव अमरावती जिल्ह्यातील सर्वात शेवटचे गाव आहे. त्या गावाला लागून यवतमाळ आणि वाशिम जिल्हयाच्या सीमा आहेत, तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर हे गाव आहे. माझ्या घरी शेती भरपूर होती, पण नियोजन नव्हते. शेतीसाठी तांत्रिक पद्धत कधीच वापरली नाही. मला शिक्षणाची जिद्द होती. माझे शिक्षण एका गावात एका जिल्ह्यात झाले नाही. संघर्ष करत तीन जिल्हे, सहा संस्था बदलवत माझे शिक्षण झाले. नोकरी निमित मी मुंबईत आलो. आज मी सेवानिवृत्त जीवन जगत आहे. नुकतीच मी अमरावती विद्यापीठातून एक पदवूत्तर परीक्षा पास केली आहे. शिकण्याला कोणतेही वय नसते असे म्हणतात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे 32 पदव्या होत्या, त्या त्यांनी 64 विषयात केल्या. 9 भाषा त्यांना अवगत होत्या. माझ्या कडेही मी संघर्षातून कोणीचीही मदत मार्गदर्शन न घेतात 6 पदव्या मिळविल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श माझ्या समोर आहे. मी शासकीय सेवेत नोकरीस होतो, पण मला शिक्षकी पेशाची फार आवड होती, म्हणून मी एका विषयात नेट परीक्षा पास केली. काही वर्ष प्राध्यापकी केली. माझे लहानपण सुखात गेले नाही. शाळेत, गावात भांडणे करण्यात मी पटाईत होतो. मी लहानपणी कोणत्याही झाडावर चढत होतो. सगळे लोक म्हणत हा मुलगा घराण्याला काळिमा लावणार, परंतु दुसरीकडे माझ्यात काही कलागुण पण होते. मी लहानपणी खूप खेळ खेळलो, अनेक खेळात मी भाग घेतला, आमच्याकडे क्रिकेट खेळ त्यावेळी नव्हता. गावात दळणवळणाची साधने नव्हती. माहिती प्रसारणाची साधने नव्हती. त्यावेळी मी अभ्यासा व्यतिरिक्त इतर पुस्तके वाचली नाहीत. इंग्रजी आणि भूगोल माझे आवडते विषय होते, आता तत्वज्ञान, व्यवस्थापन, अर्थशास्त्र आवडते विषय बनले. शाळेत, गावाच्या चौकात घडणाऱ्या विविध कार्यक्रमांचा भाग बनणे मला खूप आवडायचे. समाजकार्य मला आधीपासूनच आवडत होते. मी प्रथम शिक्षण घेतले, मला नोकरी उशिरा लागली, माझे लग्न पण उशिरा झाले. एकदा नोकरी लागल्यावर मला अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी आल्या, नवीन नोकऱ्या मला मिळत गेल्या, मी जरी शहरात असलो तरी आजही माझ्या गावाला विसरलो नाही. नोकरीत असतांनाही माझे समाजकार्य सुरूच असायचे, मी शासकीय सेवेत अनेक वर्षे कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष होतो.
महाविद्यालयीन जीवनात गावात मी सर्वात जास्त शिकलेला होतो. उच्च शिक्षित म्हणून गावचे लोक माझ्याकडून समाजकार्याची अपेक्षा करत. मी त्यावेळी महाविद्यालयाची निवडणूक लढविली होती. माझ्या गावातील तरुण मंडळींनी माझ्याकडून समाजकार्याची अपेक्षा केली होती. त्यावेळी 38 वर्षापूर्वी गावात आम्ही काही तरुण मंडळींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविला होता. ते आमच्या साठी एक आव्हान होते, कारण अनेक वर्ष हे काम कोणाला जमले नव्हते. आज मला शिवाजी महाराजांची आठवण झाली. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15 व्या वर्षी मावळातील हजारो तरुणांना सोबत घेऊन तोरणा किल्ला जिंकला होता, आणि स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली होती. आणि 44 व्या वर्षी राज्याभिषक करून सार्वभौम राजा झाले होते. शिस्त आणि धैर्य त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आजही माझे समाजकार्य सुरूच आहे, अनेक संस्थांनी मला माझ्या कार्याची दखल घेऊन मला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, त्यात राज्यभूषण पुरस्काराचा समावेश आहे. तसेच एका संस्थेने मानद डॉक्टरेट प्रमाणपत्र देऊन मला सन्मानित केले आहे. या सर्व साध्या आनंदांनी माझ्या मनात जगाविषयी उत्सुकता निर्माण केली. कवी व साहित्यिकाच्या संपर्कात, धार्मिक संघाच्या संपर्कात आल्याने काही सोशल मीडियावरच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने मला वाचनाची, लिखाणाची आणि विचार करण्याची शक्ती मिळाली. महाविद्यालीन जीवनात मला सिनेमा पाहण्याची आवड होती. काही पैसे बचत करून आम्ही सिनेमा पाहात होतो. समाधानकारक खर्चाला, शिक्षणाला पैसा घरुन कधीच मिळाला नाही. आज विविध लेख व कविता लिहून मी माझे साहित्य वाढविले. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला, तेव्हा पैसा कमी होता, पण जिद्द सोडली नाही. पैशाच्या कमतरतेमुळे मी माझ्या आवडीनुसार आवडीचे क्षेत्र, महाविद्यालय, विषय निवडू शकलो नाही. आवडीनुसार मी समाज सेवेत मात्र सहभागी होऊ लागलो. गावातील गरजू मुलांना शिक्षण, नोकरीच्या जाहिराती आजही मी त्यांना पाठवितो. निसर्गाचे रक्षण करणे, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण करणे, धार्मिक शिबिराला जाणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे यात मला आनंद मिळतो. या अनुभवांमुळे मला जीवनाचे वास्तविक मूल्य समजले, इतरांना मदत करण्यातच खर सुख आहे. आज मी माझ्या कुटुंबाचा स्नेह, कल्याण मित्रांची साथ आणि महापुरुषांची प्रेरणा स्वकर्तृत्वाने मेहनतीचे फळ मिळाले म्हणून मी समाधानकारक जीवन जगत आहे. भविष्यात मी माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेत करून एक सकारात्मक परिवर्तन घडवू इच्छितो. माझ्या अनेक कल्याण मित्रांनी आणि अनेक छोट्या मोठ्या पक्षांनी मला महानगर पालिकेच्या निवडणुकीला उभे राहण्याचा आग्रह केला होता, त्यांच्या प्रेमाखातर मी नगरसेवकाची निवडणूक पण लढवली. पण आज मला समाज कार्याची आवड आहे. जीवनातील प्रत्येक क्षणाला भरपूर प्रेम, आशा आणि प्रयत्नांसह जगावे, असा माझा संकल्प आहे. शेवटी माझे जीवन म्हणजे अनुभवांचा संगम, प्रेमाचा सागर आणि निरंतर शिकण्याची यात्रा आहे.
ट्रेनचा प्रवास मला खूप आवडतो, तोही मी नॉन एसी बोगीतून करतो, खिडकीच्या बंद काचा, त्याही पडद्यांनी झाकलेल्या, एसी बोगीत माझा जीव घुसमटतो… खिडकीच्या काचा उघडून बाहेर प्लॅटफॉर्म वर चाललेली लोकांची धांदल बघत बसण्यात अजूनही मी रमतो. लोक कसं कसं आपलं आयुष्य जगत असतात, हे तिथे मला अनुभवास येते. पुर्वी मला गप्पा मारायची आवड होती. मी ट्रेनमध्ये ओळख काढत असे, आता माझी ही सवय बदलली, मी रेल्वेने वयाच्या 45 व्या वर्षापर्यंत संपूर्ण भारतभ्रमण केले आहे. माझी तीन देशाची विदेशयात्रा पण झाली आहे. आम्ही गावात श्रीमंत होतो, पण घरी नियोजन नव्हते. आमच्या घरच्या लोकांचं जग मर्यादित होत. शिक्षणाने माणूस पुढे जातो हे समाज विसरला होता. आम्ही सर्व लोभ, मोह, द्वेष, मत्सर यात फसलो होतो, आपसात भांडणे होत होती. शत्रू आणि मित्रांची ओळख नव्हती, हा समाजाचाही दोष नव्हता, मनुवाद्यानी ही संस्कृती आमच्यावर अनेक वर्षापासून लादली होती. आम्ही गरीब नव्हतो तरी नियोजन नसल्यामुळे गरिबीत वाढलो, जगलो. मध्यमवर्गीयात समविचारसरणी असलेल्यात साहजिकच मी जास्त रुळलो, आजही ते मला आपले वाटतात, इतर समाजावर मनुवाद्याचे अनेक वर्षांचे संस्कार होते ते आजही सुटत नाही, या लोकांचा मला नोकरी करतांना फार त्रास झाला, म्हणून मी एकांतवास पत्करतो, कारण मुर्खाची संगत केल्यापेक्षा एकांतवास कधीही चांगला. कल्याण मित्र मिळाले की मी त्यांच्यात कंफर्टेबल असतो, मोकळं बोलायला मला फार आवडतं… त्यात तत्वज्ञान, धार्मिक चर्चा महापुरुषावर आणि साधूसंतावर चर्चा जास्त आवडते. मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्स मधल्या पार्ट्या मला आवडत नाही, मला तिथल्या त्या कृत्रिम फॉरमॅलिटीज जमत नाही आवडत सुद्धा नाहीत. मी समोरच्याला टाळी देत मोठं तोंड उघडुन पोटातून खदखदा हसणाऱ्यांपैकी आहे, मिटलेल्या ओठांनी छोटंसं औपचारिक स्माईल मी देऊ शकत नाही. मला हसू आवरत नाही. विनाकारण पैसा उधळणं मला आवडत नाही, काटकसर करणे मी माझ्या घरूनच शिकलो, कारण अठरा विश्व दारिद्रय आम्ही समाजात पाहिल, ज्या गोष्टीं शिवाय अडत नाही त्या गोष्टी मी कधी घेत नाही, मी काटकसरी आहे, पण कंजूस नाही, लहान असल्या पासून सवयच पडली आहे काटकसरीची… गरिबीत वाढल्याने पैशाची किंमत आहे, ते मला चांगले समजले, बचत करणे हे मला चांगले जमले. कमी साधनांचा जास्तीत जास्त उपयोग मी करून घेतला. त्यामुळे आता जरी माझ्याकडे पैसा असला, तरी तो उगीच खर्च करणं मला जमत नाही. आज आम्ही कल्याणला फ्लॅटमध्ये राहतो, जिथून दिवसभर बाहेरची वर्दळ दिसते. अशा मार्केटमधल्या गजबजलेल्या वस्तीत स्टेशन पासून अगदी जवळ राहतो. सतत समोर लोकांची लगबग दिसते. आणि ती दिसायलाही हवी, ती दिसत राहिली की अंगात आळस भरत नाही, हा एक टाईमपासही असतो, या भौतिक जीवनापालीकडेही एक आध्यात्मिक जीवन आहे. ज्याने माझे जीवन बदलून गेले आहे, मी धार्मिक आहे, पण धर्मांध नाही. मी अंधश्रद्धाळू नाही. मी आळशी नसल्यामुळे काम करत राहण्याची स्फूर्ती मिळते. मी ग्रंथ वाचन, मोबाईलचा उपयोग घेतो. तेही ज्ञान मिळविण्यासाठी. मनोरंजनासाठी नाही, मला सोने आवडत नाही, खूप महागड्या गाड्या आवडत नाही. लहान गाड्या बऱ्या, कुठेही पार्क करता येतात. कार, दुचाकीने मी खूप फिरलो. सगळ्यां बरोबर सर्वसामान्या सारखंच आयुष्य जगायला आवडतं मला… मुंबईचा वडापाव मी आवडीने खात नाही. टपरी वरचा कटिंग चहा कधी पितो. माझी उच्च राहणी व उच्च विचारसरणी आहे. कपडे, चश्मा, आणि घड्याळचा मला छंद आहे. तुम्हाला सांगतो माझ्या कपाटात अनेक शर्ट पँटस् आहेत. ते प्रेस करून ठेवलेले तुम्हाला दिसणार… ते मला पुरेसे वाटतात. टाय सूट माझ्याकडे आहे. मला ते घालायला आवडत नाही, माझ्या स्वतःसाठी कपड्यांच्या दुकानात मी स्वतःच जातो, कोणाबरोबर गेलोही तरी आवडलं म्हणून कुठलं एखादं शर्ट घेतलं असं कधी झालं नाही, एकतर मला तयार कपड्याची गरज नाही आणि आवडही नाही… मी कपडे टेलरकडून शिवून घेतो.
जॅकेट्स, स्वेटर्स, मोबाईल्स आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या मी वापरतोय त्या खराब झाल्याशिवाय मी दुसऱ्या घेत नाही. शूज, घड्याळं, हे बदलवत राहतो. घरच्या देखभालीची अनेक छोटी मोठी कामे मी स्वतः घरीच करतो, मी एकटाच कुठे जाणार असलो तर मी दूरपर्यंत मी पायी जातो. कारण मला व्यायाम म्हणून चालायचे असते. ट्रॅफिक मधून लवकर समान घेऊन जाण्यासाठी मी ऑटोने जातो. मला माझ्या जीवाचे नसते लाड करून घ्यायला आवडत नाही, थोड्या अंतरा साठी मी कार मधे एसी, संगीत लावत नाही, लहानपणी भरपूर उन्हाळे अंगावर घेतले आहेत मी, मला उकाडा सहन करायची सवय आहे… रोजगार हमीची काही कामे मी केली आहेत. यापूर्वी पाचव्या मजल्या पर्यंत कोणाकडे जायचे असेल तर मी लिफ्ट वापरत नव्हतो, जिन्यानी चढून जातो, तुम्हाला वाटेल एवढं धापा टाकत येण्याची काय गरज… हा माझा व्यायामाचा भाग आहे, सवय आहे मला जिने चढायची आणि त्या निमित्ताने गुडघ्यांना व्यायाम होतो. लोकं पैशाच्या मागे का लागतात, याच मला आश्चर्य वाटते… तर त्यांचे शान शौक पुरे करून घ्यायला, पुढचं आयुष्य ऐशोआरामात घालवायला, मौज लुटत जगायला, स्वतःच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत नकळत चेहऱ्यावर श्रीमंतीचा अहंकार ओढून घ्यायला एकदमच वेगळे वाटते. एकतर ह्यासाठी मन फार मोठं असावं लागत किंवा मोह कशाचाच अजिबात नसावा लागतो..!
माझ्या मते हसणारा चेहरा आणि हसणारं मन हीच जीवनाची खरी संपत्ती आहे. पाप आणि पुण्याच्या भानगडीत मी पडत नाही. कर्म सिद्धांत मी मानतो. मला एवढ माहीत आहे की कुशल कर्माच फळ चांगले, अकुशल कर्माचे फळ वाईट मिळते. आपल्या मुळे कोणाला त्रास नको, आपल्यामुळे कोणाचे मन दुखता कामा नये. चुकीच्या निर्णयाविरुद्ध जाहीर बंड करण्याची धमक माझ्यात आहे. माझ्यात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची धमक आहे. एकटे पडण्याची मला भीती नाही. अनेक ठिकाणी समाजातील लोकांना मला मोठे करता आले, पण मला मोठे होता आले नाही. त्यातही मी समाधानी आहे. असे माझे जीवन आहे. मला वेळ नसतो, पण समाजासाठी वेळ काढावा लागतो. असा माझ्या कार्याचा भाग आहे. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो, की सत्ता असो असे मी शिकलो.
आताच्या भाषेत जर सांगायचे झाले तर आपले हे शरीररुपी जे घर आहे. ते निसर्गाने 99 वर्षाच्या कराराने (लीजने) आपणांस दिलेले आहे. ह्या शरीररुपी घराची देखभाल जर आपण नीट केली नाही. तर घर मालक अर्थात तो निसर्ग हे घर मुदती पूर्वी देखील खाली करायला लावू शकतो. आपले पूर्वायुष्य कसे आहे हे तपासुनच आपल्या पात्रतेनुसार हे सुसज्ज असे (well furnished) शरीररुपी घर तो आपणांस कराराने देतो.
म्हणूनच घराची डागडुजी जबाबदारीने करावी…होती म्हणजे काय? तर माणसातील व्यवहार उचित असावा, शीलाचे पालन सतत करुन या (शरीररुपी) घराचे भाडे चुकता करता येते, तर करार पूर्ण होईपर्यंत आपले कर्म निश्चित आपल्याला घराबाहेर काढणार नाही. कुशल कर्म केल्यास कदाचित निसर्ग आणखी देखील काही दिवस ठेवण्याचा विचार करेल. जीवनात मानवी स्वभावाबद्दल
कोणतेही नाते निभावतांना समोरच्याच्या मनातील आपली जागा माहित असणे गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात अर्थ नसतो, नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात, कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो. तर ते त्यांचे संस्कार असतात. म्हणून जिथे पटत नाही त्या ठिकाणी डोळे झाकून आंधळे व्हा, आणि कान झाकून बहिरे व्हा, शांत जीवन जगण्याचा हाच सोपा मार्ग आहे. आता आपणच ठरवायचे आहे, आपले कर्म कसे हवे… आपले कर्मच आपले उपाय कौशल्य आहे.

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here