prabodhini news logo
Home ठळक बातम्या मिरा–भाईंदरमध्ये शिवभक्तीचा महासागर

मिरा–भाईंदरमध्ये शिवभक्तीचा महासागर

0
133

शिव महापुराण कथेचा भव्य प्रारंभ – दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मिरा–भाईंदर २४ डिसेंबर २०२५ मिरा–भाईंदर शहरात श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळत असून, शिव महापुराण कथेचा भव्य आणि भक्तिमय प्रारंभ आज झाला. जागतिक कीर्तीचे कथावाचक व भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून साकार होत असलेली ही कथा शहरातील शिवभक्तांसाठी एक पर्वणी ठरली आहे.
ही शिव महापुराण कथा २४ ते २७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ५ तसेच २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत
अदानी पॉवर हाउस समोरील मैदान, पोद्दार शाळेशेजारी, जे.पी. इन्फ्रा कॉम्प्लेक्स, हटकेश, मिरा रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या पावन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पहिल्याच दिवशी दोन लाखांहून अधिक शिवभक्तांनी हजेरी लावत या कथेला ऐतिहासिक प्रतिसाद दिला.
“हर हर महादेव”च्या गजराने संपूर्ण परिसर शिवमय झाला असून, भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाच दिवस चालणाऱ्या या कथेच्या कालावधीत शिवनाम जप, अभिषेक, बेलपत्र अर्पण, उपवास, संयम आणि सदाचार यांना विशेष महत्त्व देण्यात येत आहे.
इतक्या मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतानाही आयोजकांच्या वतीने सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि शिस्तबद्ध नियोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले असून कार्यक्रम शांततेत आणि यशस्वीपणे सुरू आहे.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,
“पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून साकार होत असलेली शिव महापुराण कथा मिरा–भाईंदर शहरासाठी अभिमानास्पद आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन आनंदित झाले आहे. हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून, समाजात एकोपा, संस्कार, सद्भावना आणि आध्यात्मिक चेतना जागवणारा सोहळा ठरत आहे.”
मिरा–भाईंदर शहराच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीत या शिव महापुराण कथेने एक नवा उज्ज्वल अध्याय जोडला असून, उर्वरित दिवसांत मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here