
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा : स्थानिक नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा फरीदाबानू मो. शफी पुंजाणी यांचा पदग्रहण सोहळा तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ २४ डिसेंबर २०२५ रोजी, स्थानिक नगर परिषद कार्यालय येथे उत्साहात पार पडला. पहग्रहणासाठी पुरातन मुख्याधिकारी बंगल्याजवळ भव्य असे व्यासपिठ उभारून, चौकात नागरीकांसाठी रचनात्मक अशी आसनव्यवस्था करण्यात आलेली होती.
पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करतांना,नवनिर्वाचित नगराध्यक्षा फरीदाबानू पुंजानी यांनी, ‘कारंजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून,शहरातील पाणीपुरवठा, रस्ते,स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्या कार्यकाळात जात-पात,धर्म भाषा न पहाता पारदर्शक, लोकाभिमुख व सर्वसमावेशक कारभार करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. या
कार्यक्रमास ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात पक्षाची भूमिका मांडत नगरपरिषदेत
विकासकामांना गती देणे, सामाजिक सलोखा व न्याय राखणे व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे आवाज उठवला जाईल,असे सांगितले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक फिरोज शेकुवाले,जाकीर शेख, ॲड.सुभान खेतीवाले,हमीद शेख,अमन शाह,प्रमोद गायकवाड,गोपी डेंडूळे आदींनी मनोगत व्यक्त करून जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचे व शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास हाजी रफिक अकबानी मो. बिलाल पुंजानी यांची उपस्थिती होती. तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून शहर विकासाला चालना दिली जाईल, असे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या पदग्रहण कार्यक्रमाचे संचालन संघरत्न नरवाडे यांनी,तर आभार हेमंत चवरे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार मंडळीसह,शहरातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असल्याचे समारंभाला उपस्थित प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .















