
जीवनात घडामोडी या घडतच असतात. जीवसृष्टी ही असीम आहे. अज्ञान, अंधश्रध्दा, आळस हे मानसाचे शत्रू आहेत. आपणातील असंख्य दोष नष्ट करुन सत्याचे आकलन झाले पाहिजे. आपल्या जीवनात 2025 हे वर्ष खूप काही घडामोडी घेवून आले. मागील काही वर्षापुर्वी कोरोनामुळे सर्वांचे जीवन अस्ताव्यस्त झाले होते, तरी आपण नवीन जोमाने कामाला सुरुवात केली होती आणि कोरोनाला पळविले होते. यावर्षी आपल्या जीवनात काही सुखद तर काही दुःखद घटना घडल्या असल्या तरीही त्यावेळी कोरोना महामारी आपल्याला विसरता येणार नाही. मला तर कोरोनाने बरेच काही शिकविले, मला कोरोनाची आजही आठवण येते. लोक तसे नियम पाळतांना दिसत नव्हते, तसे कोरोनाने मलाही सोडले नाही, पण कोरोना काळात जी शिस्त दिसली, ती यापुर्वी कधी पाहिली नव्हती. त्यामुळे आता निसर्गाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. नाहीतर निसर्ग परीक्षा घ्यायला कधीही येऊ शकतो .
प्रदूषण वाढत आहे, जगातील कोणतीही महामारी असो, वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, जंगलतोड, अत्याधुनिक उपकरणांचा वापर, परमाणू परीक्षण, युद्धजन्य परिस्थिती, आण्विक शस्त्रे पृथ्वीवरील वाढता दारूगोळा इत्यादी अनेक कारणांमुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर प्रचंड प्रतिकुल परिणाम होत आहे. याचे प्रायश्चित्त जगातील संपूर्ण जीवसृष्टी भोगत आहे आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार आहे फक्त मानवच. मग ते कोणत्याही देशातील असोत. कोरोना महामारी ही मानवाचीच देन होती. कोरोना मानव निर्मित आहे. आज जगातील वातावरणाचा मनुष्यावर परिणाम होत आहे. जगाचे तापमानात वाढ होत आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ होत आहे. हा मानवाला धोक्याचा इशारा आहे. वातावरणात बदल म्हणजे पर्यावरणात मानवनिर्मित सोडलेले ज्वलनशील विषारी वायू होय. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करताना होणाऱ्या वाढत्या दुर्घटना पाहता मद्य पिऊन गाडी चालवू नये, जास्त जल्लोष टाळला पाहिजे, पुढे चालून परिस्थिती गंभीर होणार नाही याकरिता स्वतःवर सर्वांनीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जगायचं वर्तमान काळात पण, मानव हा भूतकाळ व भविष्यकाळात अडकला आहे. तणाव चिंता, काय होईल अशा निरर्थक गोष्टीत आपली ऊर्जा खर्च करतो व सत्या पासून दूर जातो आहे. मानवाने आपलं मंगल कल्याण व इतरांचही मंगल कल्याण साधण्यासाठी जीवन जगण्याची कला शिकली पाहिजे. मन सजग व नेहमी जागृत ठेवण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, स्वतःवर विश्वास, स्वदर्शन, चांगले मनन चिंतन, कल्याण मित्रांची संगत ठेवावी. ध्यान मनाला निरोगी बनवते
प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदाने जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नये. वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे कोणी सांगू शकत नाही हे लक्षात ठेवावे. आपल्या घरात खिळे असतात. त्यापैकी एक खिळा भिंतीवर लावण्यासाठी आपण उचलतो. तो ठोकता ठोकता वाकडा होतो, तर आपण तो वाकडा झालेला खिळा फेकुन देत नाही. बोटांवर हातोडीचे एक-दोन फटके बसले तरी चालतील, पण तोच वाकडा खिळा सरळ करुन आपल्याला परत वापरायचा असतो. हाच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी सकारण-अकारण वाकडं झालंय, ते संबंध सरळ करण्यासाठी केला तर आपण राग, लोभ, द्वेष, मोह, मद, मत्सर सर्व विसरुन वाकडे झालेले नातेसंबंध टिकवण्यावर भर देऊ शकतो.
मी 2025 मध्ये अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेतला. काही कार्यक्रमात त्या प्रसंगाचे औचित्य साधून गीत सादर करण्यात आले. काही कविता, लेख लिहिण्यात आल्या. रमाई जयंती, नामांतर विस्तार दिन, विद्यार्थी शाळा प्रवेश दिन, संविधान दिन, आंबेडकरी साहित्य प्रचारावर कविता, लेख लिहिण्यात येऊन सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आले. अनेक सामाजिक विषयावर कविता, लेख लिहिले, व्याख्यान दिले. अनेक कवी संमेलनात कविता सादर केल्या. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा दिल्या, धम्म वर्ग व शिबीर विशेष उपस्थिती होती, थायलंड धम्मयात्रा विशेष आठवणीत राहिली. आपण नविन वर्षाच्या सुरुवातीचा उत्सव डिंसेबरच्या शेवटपासूनच साजरा करतो. उत्सव साजरा करण्यास काहीच हरकत नाही. पण या उत्साहाला गालबोट लागू नये याची दक्षता घेतली पाहिजे.
2025 मधील माझ्या जीवनातील काही ठळक घटना.
*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून मध्ययुगीन
भारताचा इतिहास मराठा, बौद्ध संबंध अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.
*थायलंड धम्मयात्रा
*पुणे येथे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल- 2025 उपस्थित
*पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिर भेट.
*बुद्धगया येथे आंतरराष्ट्रीय धम्ममित्र परिषदेला उपस्थित.
*स्थानिक धम्म परिषदेला उपस्थित.
*संविधान विषयावर प्रजासत्ताक दिनानिमित्त व्याख्यान.
*अनेक विविध शिबिराला उपस्थित.
*नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्गाने प्रथमच प्रवास.
*अनेक लेख आणि कविता सोशल मीडियावर प्रकाशित.
*भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म आणि सुत्तपीठक या विषयावर स्पर्धा परीक्षा दिली.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित स्पर्धा परीक्षा दिली.
*पदवूत्तर पदवी सोबतच डॉक्टरेट प्रमाणपत्र प्राप्त
आदर्श जीवन जगत असतांना काही घटना या हेतुपुरस्सर घडविल्या जातात, महापुरुषांचा आदर्श आपल्यापुढे ठेवावा. ध्येय ठरवावे, मी कोरोनापासून खूप शिकलो. अशा घटना परीक्षा घेण्यासाठी येत असतात. माझ्या अनेक प्रश्नाच उत्तर कोरोना आहे. तसा निसर्ग व्याकुळ आहे, तो सर्व प्राणिमात्रांचा समतोल राखतो. तो तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतो. म्हणून जीवनात सुधार करून मानवतेला शोभेल असेच जीवन जगा. दुसऱ्यांबद्दल चांगली भावना असू द्या. दुसऱ्याच चांगल करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते, तर मनात चांगली भावना असावी लागते.
नवीन वर्ष, नवीन उत्साह, नवनवीन संकल्पना आणि संकल्प, घेऊन पुढे जायचे, मागे वळून बघतांना तितकाच आनंद होतो, जितकी पुढील उत्सुकता असते, त्यासाठी मनात दृढ विश्वास, निश्चय, नवीन संकल्प, असायला हवा, संघर्ष आणि प्रयत्न त्याबरोबरच आपली मायेची माणसं सोबत असावीत, म्हणजे सर्व मंगलमय होते. उद्या हा दिवस कधीच कुणाचा नसतो. आज आत्ता वर विश्वास हवा. उद्याचा भरोसा कुणी द्यावा.
नवीन वर्षाला तसे काही तासच बाकी आहेत. गतकाळात राहिलेल्या गोष्टी, चुकलेल्या क्षणांना सुधारत नववर्ष साक्षीला ठेवून नव्याने आयुष्याची सुरुवात करावी. आनंदाच्या क्षणांना मनात जपत हसत सामोरे जावे. गतवर्षीच्या अनुभवांची शिदोरी घेऊन येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी सिध्द होऊया, गतवर्षीच्या आठवणी आणि नववर्षाची उत्सुकता यांचा मेळ साधत नविन वर्षाचे स्वागत करुया.
सरत्या वर्षाला निरोप देतांना
प्रत्येकाकडून सत्कर्म घडो l
आगामी येणाऱ्या नवीन वर्षात
उत्कर्षाचे पाऊल पुढे पडो l
आगामी येणारे नवीन वर्ष 2026 आपल्यासाठी उत्कर्षाचे, भरभराटीचे, आनंददायी जाओ!
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















