prabodhini news logo
Home ठळक बातम्या सोलापुरात खळबळ: महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी उमेदवाराची राहत्या घरात हत्या

सोलापुरात खळबळ: महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी उमेदवाराची राहत्या घरात हत्या

0
169

सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अय्युब सय्यद या पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लष्कर परिसरातील त्यांच्या राहत्या घरात हा प्रकार घडला असून या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते. सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड लोकप्रिय होते, ज्याला लाखो व्ह्यूज मिळत होते. शनिवारी दुपारी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सीसीटीव्ही फुटेजमधून मोठा उलगडा

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, धक्कादायक दृश्ये समोर आली आहेत. रात्री ११:३० च्या सुमारास तीन अनोळखी इसम अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर पहाटे २:०० च्या सुमारास हेच तीन संशयित इसम घरातून बाहेर पडून निघून जाताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

या अडीच तासांच्या कालावधीतच त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अय्युब सय्यद यांच्या हत्येनंतर पोलिसांकडून शोध सुरू

अय्युब सय्यद यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली? हा राजकीय वादाचा प्रकार आहे की वैयक्तिक शत्रुत्व? याचा तपास सोलापूर शहर पोलीस करत आहेत. लोकप्रिय पारलिंगी उमेदवाराची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे लष्कर परिसरात तणावाचे वातावरण असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here