prabodhini news logo
Home ठळक बातम्या मुंबई हादरली! भांडूपमध्ये अनियंत्रित बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले; ४ जणांचा मृत्यू, १०...

मुंबई हादरली! भांडूपमध्ये अनियंत्रित बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले; ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

0
159

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : मुंबईतील भांडूप परिसरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी रात्री कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला एका अनियंत्रित बेस्ट बसने चिरडले. या भीषण अपघातात ४ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून १० जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री १० च्या सुमारास भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो परिसरात घडली. यावेळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची स्थानक परिसरात मोठी गर्दी होती. बसचालक बस रिव्हर्स (मागे) घेत असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि बस थेट प्रवाशांच्या अंगावर धावून गेली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि अनेकजण बसच्या चाकाखाली चिरडले गेले.

या भीषण अपघातात ३ महिला आणि १ पुरुष अशा एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ३१ वर्षीय अज्ञात महिलेचा समावेश आहे. तसेच, ५१ वर्षीय प्रशांत लाड यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जखमींना तत्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळावरील थरार

अपघात होताच परिसरात एकच आक्रोश आणि पळापळ सुरू झाली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून बसखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि ‘१०८’ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

पोलिसांनी याप्रकरणी संबंधित बेस्ट बस चालकाला ताब्यात घेतले आहे. बस रिव्हर्स घेताना चालकाचा अंदाज चुकला की काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here