
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी (ठाणे )
mojissports@gmail.com
8104170564
मिरा-भाईंदर शहरात भाजपकडून सुरू असलेले दहशतीचे आणि गुंडशाहीचे राजकारण शिवसेना कदापिही सहन करणार नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट आणि कडक इशारा राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते ना. प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
शहराचे माजी नगराध्यक्ष स्व. प्रफुल्ल पाटील यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाला भाजपने उमेदवारी देऊन मिरा-भाईंदरमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले असल्याचा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उमेदवाराकडून शिवसेना कार्यकर्ते आणि उमेदवारांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याने शहरातील शांतता धोक्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मध्यरात्री धमकी; भाजप नेत्यांचा पोलिसांवर दबाव
मिरा-भाईंदर प्रभाग क्रमांक ५ मधील शिवसेना उमेदवार कोमल यादव यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सुमारे १:३० वाजता भाजप उमेदवाराने आपल्या गुंड टोळीसह जाऊन शिवीगाळ करत धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी थेट पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सरनाईकांचा कणखर हस्तक्षेप; अखेर गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच ना. प्रताप सरनाईक यांनी तातडीने शिवसेना उमेदवार कोमल यादव आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तक्रार नोंदवण्यात टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना त्यांनी जाब विचारला. यानंतर त्यांनी थेट पोलीस आयुक्त आणि नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून कठोर सूचना दिल्या. सरनाईक यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर संबंधित गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजपची गुन्हेगारी मानसिकता उघड – सरनाईक
हत्या प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकाला उमेदवारी देणे आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे, यावरून भाजपची गुन्हेगारी मानसिकता उघड होत असल्याची तीव्र टीका सरनाईक यांनी केली.
या प्रकरणावर बोलताना ना. प्रताप सरनाईक म्हणाले,
“निवडणुका विचारांच्या जोरावर लढल्या पाहिजेत, शस्त्रांच्या आणि दहशतीच्या जोरावर नव्हे. मिरा-भाईंदरमध्ये गुंडगिरी करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. भाजप नेत्यांनी कितीही दबाव आणला तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही.”















