
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दि. 14 जानेवारी 2026 आज रात्री सुमारे 8.40 वाजताच्या सुमारास बंगाली कॅम्प परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. बंगाली कॅम्पमधील अपक्ष उमेदवार अजय सरकार याने भाजपच्या महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला कार्यकर्ती ऑटोमध्ये बसलेली असताना अजय सरकार याने तिच्या साडीला व केसांना धरून जबरदस्तीने तिला ऑटोमधून बाहेर ओढले. यानंतर रस्त्यावरच तिच्यासोबत मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात महिला कार्यकर्ती जखमी झाली असून तिला तत्काळ शासकीय दवाखान्यातील आपत्कालीन (इमर्जन्सी) वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे बंगाली कॅम्प परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अजय सरकार यांच्या कथित गुंडगिरीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “बंगाली कॅम्पची जनता अखेर किती दिवस ही दादागिरी सहन करणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संबंधित घटनेबाबत पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच महिला कार्यकर्तीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून केली जात आहे.















