
‘युवा चेतना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे थाटात उद्घाटन
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – गडचांदूर : परीक्षेला सामोरे जाताना नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्य फार महत्त्वाचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनो थांबू नका, निरंतर अभ्यास चालू ठेवा यश तुम्हाला नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन गडचांदूर नगर परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष मा. संजय मेंढी यांनी केले ते युग चेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित ‘युवा चेतना’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. उपाध्यक्ष मा. संजयजी मेंढी यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा. बालाजी पुरी होते. यावेळी गडचांदूर नगरपरिषदेचे युवा नगरसेवक तथा उद्योजक मा. तुषार अशोकराव बावणे, टाटा समूह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (चंद्रपूर) येथील मा. प्रदीप चामले सर,जालना येथील मा. तेजस्विनी कवठे मॅडम , मा. धनश्री चिताडे , मा. अरविंद मुसने, महाविद्यालयातील प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. संजयजी मेंढे सर मा. बालाजी पुरी यांच्या हस्ते तर युवा नगरसेवक मा. तुषार बावणे यांचा मा. अरविंद मुसणे यांच्या हस्ते, मा. प्रदीप चामले, मा. तेजस्विनी कवठे मॅडम यांचाही श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
‘युवा चेतना’ या उपक्रमाद्वारे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेची दारे उघडण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. दुर्गावती खुबाळकर यांनी ओघवत्या शैलीत करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कु. कुंजम शेंडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर मार्गदर्शकाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यश ताकसांडे, अर्चना मुत्यलवार, रवींद्र पवार , पिंपळकर, तृप्ती तसेच महाविद्यालयाच्या इतर कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले.















