
रस्त्यांसाठी अतिरिक्त १२०० कोटींचा निधी मंजूर – मंत्री प्रताप सरनाईक
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564
मिरा-भाईंदर १९ जानेवारी २०२६ मिरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी विकासाचा वेग आणखी वाढवला आहे. आज मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत शहरातील २५ प्रमुख विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला.
या बैठकीत चेना रिव्हर वॉटर फ्रंट रस्ता, शिवसृष्टी मार्ग, खाडी किनारा विकास, नवीन महापालिका इमारत, जरीमरी तलावातील ५१ फुटी विठ्ठल मूर्ती, क्लस्टर योजना, आरोग्य सेवा सुधारणा तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
फेब्रुवारीत मेट्रो-९चा पहिला टप्पा
मिरा-भाईंदरकरांसाठी दिलासादायक बातमी देताना मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, मेट्रो-९ चा पहिला टप्पा फेब्रुवारी २०२६ मध्ये नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
महिलांसाठी ‘उमेद’ मॉल आणि हॉस्टेल
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, केंद्र व राज्य शासनाच्या ५० कोटी रुपयांच्या निधीतून महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी ‘उमेद’ मॉल उभारण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले.
याशिवाय, महिलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल उभारण्यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच जागा निश्चित केली जाणार आहे.
खड्डेमुक्त शहरासाठी १२०० कोटींचा बूस्टर डोस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यापूर्वीच शहरासाठी २३०० कोटींचा निधी मंजूर झाला असताना, आता रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी अतिरिक्त १२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा निधी मंजूर झाला असून पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
येत्या दीड ते दोन वर्षांत संपूर्ण मिरा-भाईंदर शहर खड्डेमुक्त करण्याचा निर्धार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
संपूर्ण शहर होणार ‘वाय-फाय फ्री’
BOT (Build-Operate-Transfer) तत्त्वावर संपूर्ण मिरा-भाईंदर शहर मोफत वाय-फाय सुविधेने सज्ज होणार असून, यासाठी येत्या २ ते ३ महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
मंत्री सरनाईक यांचा ठाम शब्द
“मिरा-भाईंदरचा लोकप्रतिनिधी म्हणून शहराला अत्याधुनिक सुविधा देणे हे माझे कर्तव्य आहे. विकासाच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. दिलेल्या प्रत्येक वचनाची पूर्तता होणारच,” असा ठाम विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
नागरिकांच्या समस्या थेट सोडवण्यासाठी दर महिन्याला ‘जनता दरबार’ आणि पालिका प्रशासनाला गती देण्यासाठी नियमित आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.















