prabodhini news logo
Home ठळक बातम्या अनोखा हळदीकुंकू तिळगुळ समारंभ

अनोखा हळदीकुंकू तिळगुळ समारंभ

0
195

कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी नागपुर – अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस नागपूर द्वारे अनोखा हळदीकुंकू आणि तिळगुळ समारंभ विरंगुळा केंद्र, हनुमान मंदिर, दुर्गा नगर नागपूर येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता मेहेत्रे,
उद् घाटक डॉ.अर्चना रतकंठीवर,प्रमुख पाहुणे ॲड. रश्मी खापर्डे, प्रा.देवल अढाऊ होत्या. स्वागत गीतानंतर प्रास्ताविक भाषणात प्रणोती कळमकर यांनी दोन्ही संस्थेत घडणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती सादर केली. उद् घाटक समुपदेशक डॉ. अर्चना रतकंठीवार म्हणाल्या की , “मुलांमुलींवर कोणताही अत्याचार होत असेल तर त्यांनी त्वरीत आपल्या आईवडिलांना सांगितले पाहिजे.”
सरकारी अभियोक्ता ॲड.रश्मी म्हणाल्या की, महिलांसाठी , बालकांसाठी अनेक कायदे आहेत.ते आमच्या भगिनींनी समजून घेतले पाहिजेत.” प्रबोधनकार व अ.भा.सावित्री ब्रिगेड नागपूरच्या अध्यक्षा डॉ. स्मिता मेहेत्रे यांनी,”विधवा भगिनींच्या संदर्भात परिवर्तन होणे, त्यांचा घराघरात, समाजात सन्मान होणे ही काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन केले. त्यांनी ५१ विधवा भगिनींचा सन्मान करून एक नवा पायंडा पाडला.

संघटनेचे हे ६ वे वर्ष असून परंपरेच्या विरोधात सांस्कृतिक बंड करून या संक्रांतीच्या कार्यक्रमात उपेक्षित असलेल्या अनेक सावित्रीच्या लेकींचा सन्मान केल्यामुळे त्यांच्या दुःखावर सुखाची हळुवार फुंकर घातली गेली. सत्कारमूर्ती सामाजिक कार्यकर्त्या विद्या सुरकार, वंदना मेश्राम, नगरसेविका मंगला गवरे , यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी विधवा भगिनीं निर्भिडपणे आपली वाटचाल करतील, असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी विधवा भगिनी सुहास होरे ज्यांच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले, त्या गहिवरून म्हणाल्या ,”पती गमावल्यानंतरच वर्षभरातच सर्व नाते कसे बदलतात हे अनुभवले. तुम्ही हळदीकुंकू लावून सन्मान केला मला तर आनंद झाला.
परंतु माझे पती स्वर्गातून बघत असतील त्यांना माझ्यापेक्षा जास्त आनंद झालेला असेल.”मनीषा पिल्लारे डोळ्यात अश्रू आणून म्हणाल्या,” २५ वर्षापासून कोणी मला हळदीकुंकवाला बोलाविले नाही .आज आपण हळदीकुंकू लावून माझा सत्कार केला.माझ्या जीवनाचे सार्थक झाले.” सिंधू कांडलकर म्हणाल्या” शाॅल, हळदीकुंकू ,तिळगुळ, वाण, झाडाचे रोपटे देऊन माझा सन्मान केल्यामुळे ३० वर्षानंतर माझ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली”. असा अनोखा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल डॉ. स्मिता मेहेत्रे व निशिकांत मेहेत्रे यांच्या विषयी सर्वांच्या मनात आदराच्या भावना निर्माण झाल्या .यावेळी रेखा हिरुडकर आणि पी. एन. जी. तर्फे विविध स्पर्धा घेतल्या आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली . निमा बोडखे यांनी मनोगत सादर केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन डॉ. शील बागडे यांनी केले .पाहुण्यांचा परिचय मनीषा बाविस्कर, उज्वला पाटील, नंदा सोनुले ,जयश्री धात्रक यांनी केले. समाजातील उपेक्षित भगिनींना सन्मानित केल्याने कार्यक्रम हृदयस्पर्शी झाला. उपस्थित भगिनींना “पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्यासाठी रोपटे, वाण व फराळ देण्यात आला. आभार मिनल रेवतकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनंदा जांबुतकर,वंदना क्षीरसागर ,राणी शहा, सरिता राणेकर, डॉ. गोपाल चव्हाण,ॲड.रोमा खंडवाणी, संगीता लंगडे, ज्योती मून, जयश्री मोहितकर,छाया महाले, मंजुषा चरडे,शोभा कोठेकर, कल्पना कडू , संगीता लंगडे, शुभांगी डांगरे आदींनी सहकार्य केले. भरगच्च उपस्थितीत अनोखा तिळगुळ समारंभ पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here