
लेखक – डॉ. अनिरुद्ध वनकर
प्रशांत रामटेके
संपादक
प्रबोधिनी न्युज
माझ्या आयुष्यातील ज्येष्ठ प्रेरणास्थान, चंद्रपूरातील आंबेडकरी आंदोलनाचे तत्त्वनिष्ठ योद्धा, सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिस्तीचे मूर्तिमंत प्रतीक, आणि आमच्या सर्वांसाठी चळवळीचे बाप माणूस म्हणून ओळखले गेलेले आदरणीय पी. व्ही. मेश्राम सर यांच्याशी माझे नाते आजपासून नव्हे, तर तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या तरुणपणातच आकारास आले….
त्या काळी मी चळवळीची गाणी म्हणणारा एक साधा तरुण गायक… आणि ते होते चळवळीचे नायक.
त्यांच्या एका शब्दात, एका नजरेत, आंबेडकरी चळवळीची शिस्त, समर्पण, दूरदृष्टी, आणि बाबासाहेबांविषयीचा जिव्हाळा दिसायचा.
पि. व्ही. सर बोलायचे कमी, पण मनातली भावना बोलत राहायची.
त्यांचा आवाज आदेश देत नसे, तर वाट दाखवत असे; आणि हात उंचावत नसे, तर पाठीशी उभा राहत असे.
कलावंताला मान देणारे हात
चंद्रपुरातील सिद्धार्थ विद्यालयात मी एकट्याने सादर केलेला ४५ मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम…
विद्यार्थ्यांनी दिलेला मान, मिळालेले काही रुपये—ही माझ्यासाठी केवळ उपजीविकेची रक्कम नव्हती, तर चळवळीच्या प्रवासाचा पहिला मानाचा दगड होता.
सरांच्या डोळ्यांत पैसे दिसले नाहीत—
त्यांना दिसला तो उपाशीपोटी गाणं गाणारा एक तरुण, जो चळवळ जगवण्याचा ध्यास घेत होता.
याच भावनेतून त्यांनी माझ्या डोक्यावरून हात कधी काढला नाही.
तो हात कधी आदेशाचा नव्हता—तो आधाराचा, प्रेमाचा, आणि कलावंताला मोठं करण्याच्या अटळ विश्वासाचा होता.
कुटुंबाचा वारसा: आधाराचा धागा.
केवळ मेश्राम सरच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबानेही तीच परंपरा निभावली.
अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएएस अनिता मेश्राम मॅडम यांनी नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात असताना मला सन्मान, मंच, कार्यक्रम, आणि शासन योजनांची दिशा दिली.
एका घराण्यातील वडील पितृतुल्य असावेत आणि मुलांनीही त्याच मार्गावर चालत कलावंताची काळजी घ्यावी—
हा प्रसंग माझ्यासाठी संगीतापेक्षाही मोठा सूर आहे.
निवडणूक आणि साथ
सन २०१४ मध्ये मी भारिप बहुजन महासंघाचा उमेदवार असताना—
माझ्या झोपडपट्टीतील छोटीशी खोली, घराच्या वरचा अरुंद हॉल, आणि त्या जागेत वाकून बसत माझ्या निवडणुकीची धुरा सांभाळणारे मेश्राम सर —
हा प्रसंग विसरणे माझ्यासाठी अशक्य आहे.
कलावंताचा आधार बनून उभं राहणं, हे त्यांच्या सारख्या माणसांनाच जमतं.
मी बाबासाहेबांच्या गीतात कुठेतरी इतरत्र उभा होतो, आणि इथे त्यांची चिता प्रज्वलित होत होती…
हा आयुष्यातला सर्वात वेदनादायी प्रसंग.
मी उपस्थित राहू शकलो नाही—सर, यासाठी मी आजही मनःपूर्वक क्षमा मागतो.सर, तुम्ही अजूनही आमच्यात आहात
आज ते या मिटलेल्या डोळ्यांनी जगाला पाहत नसतील,परंतु चंद्रपूरच्या चळवळीचा प्रत्येक ठसा, प्रत्येक श्वास, प्रत्येक कण हा त्यांच्या कार्याने, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने , आणि त्यांच्या प्रेरणेने जिवंत आहे.
ते सर नव्हते—ते संस्थाच होते.ते शिक्षक नव्हते—ते विचार होते.ते चळवळीचे सैनिक नव्हते—ते चळवळीचे बाप माणूस होते.
पी. व्ही. मेश्राम सरांनी घडवलेले विद्यार्थी आज अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आणि मी?
मी अजूनही गायक आहे—
परंतु त्या गाण्यात सरांचे संस्कार, त्यांचा छंद, त्यांची दृष्टी, त्यांचे प्रेम, आजही स्वर बनून घुमत आहे.
सर, आपण नसाल देहाने, पण विचाराने आपण उद्याही जगाल,आमच्या मनात, आमच्या गाण्यात,
आणि प्रत्येक चळवळीच्या पावलांमध्ये….
लेखक
डॉ. अनिरुद्ध वनकर,चंद्रपूर















