prabodhini news logo
Home ठळक बातम्या जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

0
86

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळालाही तितकेच महत्त्व द्यावे – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि.२२/०१ – विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दि. २१ जानेवारी, २०२६ रोजी ऑल सेट्स हायस्कूल, भवाळे, तालुका भिवंडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

या स्पर्धांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेची सुरुवात क्रीडा मशाल प्रज्वलन करून तसेच पाच तालुक्यांतील विद्यार्थी प्रतिनिधींनी मानवंदना देऊन करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबतच मैदानी खेळांना तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात. निरोगी व सुदृढ आयुष्यासाठी दररोज खेळाची सवय लागणे गरजेचे आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या ‘दिशा’ उपक्रमाच्या पुढील टप्पा म्हणून ‘मिशन भरारी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. या उपक्रमांतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संशोधन संस्था व शैक्षणिक केंद्रांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व विशद केले. तसेच जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये केंद्र पातळीवर प्रथम क्रमांक मिळविलेले संघ तालुका पातळीवर, तर तालुका पातळीवर प्रथम आलेले संघ जिल्हा पातळीवरील स्पर्धांसाठी पात्र ठरले होते. या स्पर्धा सांघिक व वैयक्तिक प्रकारात तसेच मुले व मुली स्वतंत्र गटात घेण्यात आल्या. सांघिक स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, लंगडी, लेझीम या खेळांचा समावेश होता, तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये ५० मीटर व १०० मीटर धावणे, २५x४ रिले, लांब उडी व संगीत खुर्ची या खेळांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.

कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती भिवंडी संजय अस्वले, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती शहापूर हिराजी वेखंडे, विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक तसेच प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव यांनी समर्थपणे पार पाडली.

स्पर्धेदरम्यान मनीषा गामणे व रविंद्र तरे यांनी प्रभावी सूत्रसंचलन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण केले. संपूर्ण स्पर्धा उत्साहात, शिस्तबद्ध आणि खेळाडू वृत्तीने पार पडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here