
एजंटांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन – भाकपाचा ठाम इशारा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – एटापल्ली : कष्टाने कमावलेल्या पैशांचा घाम ओकलेल्या शेतकऱ्यांचे, मजुरांचे आणि आदिवासी बांधवांचे स्वप्नं चुरगाळणाऱ्या ‘सुविधा फार्मिंग अँड अलाईड लिमिटेड’ आणि ‘क्रिएटिव्ह इंडिया मल्टी स्टेट ॲग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ या कंपन्यांनी कोट्यवधींची भयंकर फसवणूक केली आहे. जादा परताव्याच्या खोट्या आमिषाने ग्रामीण गरीबांची लुटली गेली आणि आता ते रस्त्यावर पडले आहेत. या अन्यायाविरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना भावुक निवेदन सादर करून स्थानिक एजंटांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे.
भाकपाचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड रमेश कवडो यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली तहसील कार्यालयासमोर उभे राहिलेले कार्यकर्ते आणि पीडित नागरिक – त्यांच्या डोळ्यात अश्रू, हृदयात क्रोध! निवेदनात सांगितल्याप्रमाणे, या कंपन्यांनी स्थानिक एजंट नेमून “कंपनी शासनमान्य, गुंतवणूक सुरक्षित” अशी गोड बोलंनी ग्रामीण जनतेचा विश्वास संपादन केला. शेतकरी, आदिवासींनी कष्टाचे पैसे गुंतवले, पण कंपन्या अचानक गायब झाल्या. मुद्दल बुडाला, व्याज गेला – आता एजंट जबाबदारी झटकत आहेत आणि गरीब कुटुंबं आर्थिक संकटात बुडाली आहेत!
आदिवासी-शेतकरी कुटुंबांचे डोळ्यातील अश्रू आणि हातात रिकामी जेब!
या फसवणुकीमुळे सत्यनारायण पुज्जलवार, प्रतिमा जोरदार, कुमारेश जोरदार, संजय पुज्जलवार, आरती पुज्जलवार, जोसेफ बारावा, राजेश कुजूर, सुरेश कुजूर, जुलेश कुजूर आणि जगमा कुजूर यांसारख्या अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. कष्टाने गोळा केलेले पैसे गमावून ते आता कसे जगणार? ही फसवणूक केवळ खाजगी नाही, तर सरकारी नियंत्रण यंत्रणेच्या अपयशाची परिणती आहे. भाकपाने स्पष्टपणे सांगितले – दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी, अन्यथा न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरू!
जनआंदोलनाचा इशारा देत उपस्थित कार्यकर्त्यांचा जयघोष!
निवेदन देताना तालुका सहसचिव कॉम्रेड विशाल पुज्जलवार, कॉम्रेड सतू हेडो आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषी संचालक, व्यवस्थापक आणि एजंटांवर कारवाई केली नाही आणि पीडितांचे पैसे व्याजासह परत मिळवून दिले नाहीत, तर भाकपा जनतेसोबत तीव्र जनआंदोलन छेडेल असा धडाका लावला. गरीबांच्या न्यायासाठी लढा सुरू राहील.















