
चाकूरमध्ये सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत जानवळ (ता. चाकूर) येथे झालेली जाहीर सभा प्रचंड गर्दीमुळे लक्षवेधी ठरली. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकारणावर प्रहार करत वंचित बहुजन आघाडीची विकासात्मक धोरणे मांडली. ते म्हणाले की, बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित कटिबद्ध आहे. रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि सर्वोत्तम आरोग्य सुविधा हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पुढे ते म्हणाले, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी केवळ वंचित बहुजन आघाडीकडेच ठोस भूमिका आहे. “स्थानिक विकासाचे मॉडेल बदलण्यासाठी आणि सामान्यांच्या हाताला सत्ता देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्या,” असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी यावेळी केले.
या सभेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून उमेदवारांचे बळ वाढवले. यावेळी या जाहीर सभेला अविनाश भोसीकर (राज्य कार्यकारिणी सदस्य), संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव), अमोल लांडगे (युवा आघाडी राज्य सदस्य तथा नगरसेवक गटनेता), मंजुषा निंबाळकर (जिल्हाध्यक्ष), यांच्यासह सुजाता अजनिकर, आकाश इंगळे आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते.
सुजात आंबेडकरांच्या या सभेला झालेली तुफान गर्दी पाहता, लातूरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी इतर पक्षांसमोर मोठे आव्हान उभे करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरुणांचा वाढता प्रतिसाद हा निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरू शकतो.















