
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राज्यात सध्या महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच मुख्य लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या दबावाबाहेर राहून आणि त्यांच्या दावणीला न बांधले जाता खऱ्या अर्थाने संघर्ष करणारा ‘वंचित’ हाच एकमेव पक्ष आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले. परभणी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावरही ते बोलले.
सुजात आंबेडकर यांनी परभणीतील राजकीय स्थितीचे विश्लेषण करताना सांगितले की, परभणीत काँग्रेसची ताकद पूर्णपणे क्षीण झाली आहे. त्यांना उमेदवारही मिळत नाहीत, ७० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ७० ते ८० टक्के काँग्रेस ही भाजपच चालवत आहे. जिथे काँग्रेस स्वतंत्र आहे तिथे युती शक्य असते, पण जिथे ती ‘भाजपप्रणीत’ आहे तिथे समन्वय होणे अशक्य आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रश्नचिन्ह –
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवार गट भाजपमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा होती. या गंभीर विषयावर कुणीही स्पष्टपणे का बोलत नाही किंवा खुलासा का करत नाही? हा मोठा प्रश्न आहे. येत्या पाच वर्षांत महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपमध्ये दिसतील, असेही ते म्हणाले.
‘ब्लॅक बॉक्स’वरून सरकारला घेरले
अजित पवार यांच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी ‘ब्लॅक बॉक्स’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. कोणत्याही मोठ्या दुर्घटनेनंतर २४ ते ४८ तासांत ब्लॅक बॉक्समधील माहिती समोर येणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप ही माहिती बाहेर का आली नाही? ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, मात्र सरकारकडून यावर मौन बाळगले जात आहे, असे सुजात आंबेडकर बोलले.
आज सर्व प्रस्थापित शक्ती एकवटल्या असताना सर्व वंचित घटक मोठ्या ताकदीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहत आहेत. भाजपला खऱ्या अर्थाने हरवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव विश्वासार्ह पर्याय जनतेसमोर आहे, असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.















