
बोरोळ येथे प्रा. अंजली आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात संपन्न
देवणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर बोरोळ (ता. देवणी) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा प्रचंड उत्साहात पार पडली.
या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली.
सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना सांगितले की, वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरलेली चळवळ आहे. ग्रामीण भागातील विकास आजही दुर्लक्षित आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांअभावी जनता त्रस्त आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था दाखवून देत त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर दिला. जिल्हा परिषदेच्या शाळांचे सक्षमीकरण करून विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे. शिक्षण हा विकासाचा पाया असून त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.
तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगले रस्ते आणि सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
d
परिवर्तनासाठी मतदानाचे आवाहन
स्थानिक विकासातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले. त्यांच्या भाषणाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. सभास्थळी कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या जाहीर सभेला वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमोल लांडगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, सुजाता अजनिकर यांच्यासह पक्षाचे जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















