
प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोठागदारोळ करण्यात आले. मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पाहायला मिळाला. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भावरून सुरू झालेला वाद थेट खासदारांच्या निलंबनापर्यंत पोहोचला. कागद भिरकावणे, घोषणाबाजी आणि गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पुन्हा एकदा चीनची घुसखोरी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. सोमवारी त्यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत सरकारवर टीका केली होती. आज पुन्हा तोच संदर्भ देण्याचा प्रयत्न करताना, तालिका अध्यक्षांनी त्यांना रोखले. केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोला, अशी तंबी अध्यक्षांनी दिल्यानंतरही राहुल गांधींनी आपले भाषण सुरूच ठेवले.
राहुल गांधींना बोलण्यापासून रोखल्याने काँग्रेस खासदार आक्रमक झाले. संतापलेल्या खासदारांनी तालिका अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावले, ज्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. या वर्तणुकीची गंभीर दखल घेत सरकारने आठ खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला, जो मंजूर करण्यात आला.
निलंबित झालेले खासदार:
१) प्रशांत पडोळे (महाराष्ट्र)
२) अमरिंदर सिंग राजा वारिंग
३) गुरदीप सिंग औजला
४) हिबी ईडन
५) मणकिम टागोर
६) किरण रेड्डी
७) वेंकट रमण
८) डीन कोरियाकोस
हे आठही खासदार आता उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.
सभागृहात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी राहुल गांधींच्या भाषणावर वारंवार आक्षेप घेतले. दोन्ही बाजूचे खासदार आमनेसामने आल्याने सभागृहाचे वातावरण तापले होते. अखेर गोंधळ न थांबल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.















