prabodhini news logo
Home ठळक बातम्या भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी...

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

0
65

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्विट करत जाहीर केले आहे की, भारत रशिया कडून तेल खरेदी करणार नाही, त्याबदल्यात अमेरिकेकडून तेल खरेदी करेल तसेच अमेरिकेकडून शेतमालाची खरेदी सुद्धा भारत करेल त्या बदल्यात टेरिफ कर कमी करून तो 25 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. भारत सरकार अमेरिकेच्या दबावापुढे शरण गेली आहे का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना थेट प्रश्न विचारले आहेत. पाकिस्तानसोबत झालेल्या शस्त्र संधीमध्ये (सीजफायर) डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा जो दावा केला आहे, तो भारत सरकार मान्य करत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच ट्रम्प यांनी केलेल्या आणखी एका दाव्याचा उल्लेख करत आंबेडकर यांनी स्पष्टता मागितली आहे. भारताने रशियन तेल खरेदी थांबवून अमेरिकेकडून आणि संभाव्यतः व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. हा दावा खरा आहे का? असे प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच भारत खरोखरच रशियन तेलाऐवजी अधिक महाग तेल अमेरिकेकडून आयात करणार आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

याशिवाय भारत अधिक प्रमाणात अमेरिकन कृषी उत्पादने आयात करणार आहे का, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. असे झाल्यास भारतीय शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक दबाव येईल आणि देशातील एकूण कार्यबलाच्या सुमारे ४० टक्के असलेल्या शेतकरी वर्गाची उपजीविका धोक्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

या कराराला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भारतविरोधी आणि अमेरिकाधार्जिणा असे संबोधले आहे. भारत आता अमेरिकेच्या तालावर नाचत आहे का? असा थेट सवाल करत त्यांनी केंद्र सरकारकडून जाहीर उत्तराची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here