
३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली
प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राजस्थान : शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या कोटा शहरात शनिवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. जवाहर नगरमधील इंदिरा विहार भागात एक निर्माणाधीन दोन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत ‘एलन’ संस्थेतील एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला, तर ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण बदले गेल्याचे सांगण्यात आले.
नेमकं काय घडलं?
शनिवारी रात्री ८:४५ च्या सुमारास, जेव्हा इंदिरा विहार परिसर विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने भरलेला होता, तेव्हा अचानक एका मोठ्या आवाजाने परिसर हादरला. ज्या इमारतीचे बांधकाम सुरू होते, तिच्या तळमजल्यावर ‘दिल्ली नॉनव्हेज’ नावाचे रेस्टॉरंट सुरू होते. रात्रीच्या जेवणासाठी विद्यार्थ्यांची तिथे मोठी गर्दी असतानाच ही इमारत क्षणात जमिनीदोस्त झाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धावून येत बचावकार्य सुरू केले. मात्र, प्रशासकीय यंत्रणा, अग्निशमन दल आणि क्रेन घटनास्थळी पोहोचायला तब्बल दीड तास उशीर झाल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. जर मदत वेळेवर मिळाली असती, तर कदाचित त्या विद्यार्थ्याचा जीव वाचला असता, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.















