
नियम कागदावरच, शहर कचऱ्यात!
यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – “स्वच्छ यवतमाळ, सुंदर यवतमाळ”च्या गप्पा मारणाऱ्या नगरपालिकेचा फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. ई-रिक्षा चालक आणि सफाई कर्मचारी कामावर गैरहजर असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी स्वतः मैदानात उतरून कचऱ्याची गाडी घेऊन पालिकेच्या कारभाराचा पर्दाफाश केला.
यवतमाळ नगरपालिकेने कचरा संकलनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ई-रिक्षांची सोय केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे नियम केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये ई-रिक्षा वेळेवर येत नाहीत तसेच सफाई कर्मचारी कामावर दांड्या मारत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. यावेळी, शहरातील मुख्य रस्ते आणि वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने, अखेर नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सफाई कर्मचारी गैरहजर असल्याचे पाहून त्यांनी स्वतः मैदानात उतरून महापालिकेचा निषेध केला.
ई-रिक्षा चालक आणि सफाई कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे यावरून स्पष्ट होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहराची अवस्था बिकट झाली असून, आता तरी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल यवतमाळकर विचारत आहेत.















