prabodhini news logo
Home एटापल्ली सिरोंचा तालुक्यात भाकपचा तालुका कोन्सिल स्थापन

सिरोंचा तालुक्यात भाकपचा तालुका कोन्सिल स्थापन

0
156

तेलगू बहुल भागात लोकशाही मार्गाने जनतेच्या रोजच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र होणार

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिरोंचा तालुक्यातील तेलगू बहुल भागात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (भाकप) तालुका कोन्सिल अधिकृतपणे स्थापन करण्यात आला. शोषित, पीडित व कष्टकरी जनतेच्या रोजच्या ज्वलंत प्रश्नांवर संविधानिक व लोकशाही मार्गाने संघटित संघर्ष उभारण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत कॉ. रवी बारसांगडी यांची तालुका सचिव म्हणून निवड व नियुक्ती करण्यात आली. तसेच कॉ. गणेश कासेटटी, कॉ. अशोक तोकला व इतर सहकाऱ्यांची तालुका कोन्सिल सदस्य म्हणून निवड व नियुक्ती करण्यात आली.

ही निवड व नियुक्ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या हस्ते करण्यात आली. या निर्णयांना जिल्हा कोन्सिल सदस्य कॉ. सुरज जककुलवार तसेच कॉ. आकाश तेलकुंटलवार यांनी अनुमोदन दिले.

यावेळी पक्ष नेतृत्वाने सांगितले की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला तेलगू जनतेचे हक्क, अधिकार तसेच जल, जंगल व जमीन वाचवण्यासाठी आणि जमीनदार (दोरा) वर्गाच्या शोषणाविरुद्ध लढण्याचा शंभर वर्षांचा इतिहास आहे. हीच लढाऊ परंपरा पुढे नेत सिरोंचा तालुक्यातील कष्टकरी जनतेच्या रोजच्या प्रश्नांवर लोकशाही, शांततामय आणि कायदेशीर मार्गाने संघर्ष छेडला जाणार आहे.

तालुक्यातील जनता आज पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, अनियमित वीजपुरवठा, रस्ते व दळणवळणाची दुरवस्था, आरोग्य केंद्रांतील डॉक्टर व औषधांची कमतरता, शाळांमधील शिक्षकांची टंचाई, धान खरेदी व हमीभावाचा प्रश्न, रोजगार हमी योजनेतील मजुरी थकबाकी, वनहक्क कायद्याची अपुरी अंमलबजावणी, जमीन अतिक्रमण व जबरदस्तीची जमीन बळकावणी अशा गंभीर समस्यांनी त्रस्त आहे.

या सर्व प्रश्नांवर गावसभा, निवेदने, मोर्चे, आंदोलने, चर्चा व लोकशाही प्रक्रियांच्या माध्यमातून शासन व प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सिरोंचा तालुक्याच्या तेलगू बहुल भागात जनतेचा हक्काचा संघर्ष आता अधिक तीव्र होणार असून, लाल झेंड्याखाली शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित,कामगार व सर्वसामान्य जनतेची एकजूट लोकशाही मार्गाने अधिक मजबूत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here