
एटापल्ली तालुक्यातील मौजा माटवर्शी (ग्रामपंचायत गट्टा) येथील सौर ऊर्जा आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जल जीवन मिशन (२०२२-२३) अंतर्गत उभारण्यात आलेली ही योजना काही महिन्यांपासून बंद अवस्थेत होती.
यामुळे गावातील महिला, लहान मुले व वृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब अंतरावर जावे लागत होते. पाण्याअभावी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने माटवर्शी ग्रामसभेने भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे मदत मागितली होती.
ग्रामसभेच्या विनंतीची दखल घेत कॉ. मोतकुरवार यांनी शासन-प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला. संबंधित विभागाशी संपर्क साधून बंद पडलेली यंत्रणा तातडीने दुरुस्त करून योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने योजना दुरुस्त करून पुन्हा सुरू केली.
नळ योजना सुरू झाल्याने गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत भविष्यातही गावातील मूलभूत प्रश्न भाकपाने तत्परतेने सोडवावेत, अशी भावना व्यक्त केली आहे.















