
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर (पडोली): प्रशासकीय यंत्रणेतील संगनमत आणि फसवणुकीचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पडोली ग्रामपंचायतीमध्ये एका जिवंत महिलेला, सौ. सुगंधा बाई वसंत मडामे, यांना चक्क मृत घोषित करून त्यांचा बनावट मृत्यू दाखला (Fake Death Certificate) तयार करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाबाबत NSUI चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शफाक शेख यांनी पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कारस्थान आणि बँक खाते बंद
तक्रारीनुसार, हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून एक जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान आहे. या बनावट मृत्यू दाखल्याच्या आधारे संबंधित जिवंत महिलेचे बँक खाते देखील बंद करण्यात आले आहे. सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित शासकीय अधिकारी यांच्या संगनमताशिवाय इतका मोठा प्रशासकीय गुन्हा घडणे शक्य नसल्याचा आरोप NSUI ने केला आहे.
BDO चौकशी अहवालातील गंभीर विसंगती
गट विकास अधिकारी (BDO) यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाने या प्रकरणातील संशय अधिकच वाढवला आहे:
रेकॉर्डमध्ये नोंद नाही: पडोली ग्रामपंचायतीच्या मृत्यू नोंदवहीची तपासणी केली असता, या महिलेच्या मृत्यूची कोणतीही नोंद आढळली नाही.
स्वाक्षरीवर वाद: ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी कोणत्याही ऑफलाईन दाखल्यावर स्वाक्षरी केल्याचे नाकारले आहे, मात्र बनावट दाखल्यावर स्वाक्षरी आणि शिक्का असल्याचे दिसून येत आहे.
कर्मचाऱ्याची कबुली: चौकशी दरम्यान एका कर्मचाऱ्याने नाव साधर्म्यामुळे मानवी चूक झाल्याचे मान्य केले आहे.
NSUI चा इशारा आणि मागण्या
शफाक शेख यांनी या प्रकरणात सामील असलेल्या सर्व दोषींवर IPC कलम 420, 467, 468, 471, 166, 120-B/34 आणि BNS 2023 च्या विविध कलमांन्वये तातडीने FIR नोंदवण्याची मागणी केली आहे.
प्रमुख मागण्या:
फॉरेन्सिक तपास: मृत्यू दाखल्यावरील स्वाक्षरी आणि शिक्क्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी.
डिजिटल ऑडिट: ऑनलाईन पोर्टल लॉग, युजर आयडी आणि IP तपशीलाची सखोल चौकशी व्हावी.
कठोर कारवाई: दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करण्यात यावी.
प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई न केल्यास NSUI च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.















