prabodhini news logo
Home ठळक बातम्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेने दणाणले वाशिम शहर

जय शिवाजी जय भारत पदयात्रेने दणाणले वाशिम शहर

0
74

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा

“मेरा युवा भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित”

वाशिम प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि.१९ फेब्रुवारी मेरा युवा भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जय शिवाजी जय भारत’ च्या घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून सोडत देशभक्ती, सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी संदेश देणारी भव्य पदयात्रा उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा उत्साह, आकर्षक वेशभूषा आणि शिस्तबद्ध संचलनामुळे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल केंदळे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत देशभक्तीची भावना जपण्याचे आवाहन केले.

पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये स्वप्निल केळे राजमता जिजाऊ यांच्या आकर्षक वेशभूषेमध्ये जिल्हा युवा पुरस्कारार्थी कु.आकांक्षा गायकवाड आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत व पथनाट्य. आणि वैष्णवी पानझाडे यांनी सादर केलेली शिव गर्जना या सादरीकरणातून स्वराज्य, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना दाद दिली.

या पदयात्रेत राष्ट्रीय छत्र सेनेचे विद्यार्थी, नेहरू युवा मंडळ केकतउमरा, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी, स्काऊट गाईड्स तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींच्या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थिनी राजा प्रसेनजित संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हातात देशभक्तीपर फलक, घोषवाक्ये आणि पारंपरिक वेशभूषेमुळे पदयात्रेला विशेष रंगत आली.

सुरुवातीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी चौक येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावर नागरिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत देशभक्तीपर घोषणांमध्ये सहभाग नोंदविला.

अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा युवा पुरस्कारार्थी प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले. एकूणच, ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेच्या माध्यमातून देशप्रेम, सामाजिक सलोखा आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान यांचा प्रभावी संदेश वाशिमकरांपर्यंत पोहोचला. यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नेहरू युवा मंडळ केकतउमरा, मेरा युवा भारत केंद्र स्वयंसेवक यांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here