prabodhini news logo
Home गडचिरोली झाडीपट्टी रंगभूमीचे नटसम्राट पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांना आज वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

झाडीपट्टी रंगभूमीचे नटसम्राट पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांना आज वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

0
234

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्याच्या झाडीपट्टी रंगभूमीला विशेष महत्त्व आहे. वनराईने संपन्न असलेला, निसर्ग सौंदर्याने नटलेला, धान पिकामुळे सुपीकतेने भरलेला हा भूभाग नाट्य क्षेत्रासाठी ही अत्यंत अनुकूल आहे. आजही मल्टिमीडिया च्या काळात साधारणता ५५नाट्य कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक गावात नाट्यप्रयोग होतो. कुरुड सारख्या गावात आजही एकाच रात्री आठ नाट्यप्रयोग होतात. सामाजिक कौटुंबिक विविध विषयावरील नाटकाद्वारे ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे रंजन व प्रबोधन केले जाते.पाच हजार कलावंतांच्या उदरनिर्वाहाची सोय करणारी आणि सत्तर करोडपेक्षाही अधिक आर्थिक उलाढाल करणारी वैभवसंपन्न रंगभूमी म्हणून झाडीपट्टीकडे पाहिले जाते. विठ्ठल पाकलवार, ग.रा.वडपल्लीवर, डॉ.परशुराम खुणे, डॉ.शेखर डोंगरे, डॉ.अनिरुद्ध वनकर, सदानंद बोरकर, प्रल्हाद मेश्राम, युवराज गोंगले यांच्या प्रमाणेच खुणे असंख्य रंगकर्मीनी झाडीपट्टी रंगभूमीचे क्षेत्र विस्तारले. डॉ.खुणे यांनी अभिनयाच्या जोरावर आपला रसिक प्रेक्षकवर्ग तयार केला, ही जमेची बाजू आहे.
अत्यंत ग्रामीण भागातील गुरनोलीच्या गल्लीतल्या निष्ठेने रंग देवतेची आराधना करणाऱ्या समर्पित कलावंतांचा दिल्लीत झालेला सत्कार भूषणावह स्वरूपाचाच.
दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात २०२३ एका शानदार सोहळ्यात विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीवरील रसिकप्रिय कलाकार व झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणून ओळखले जाणारे डॉ. परशुराम खुणे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. हा खरे तर झाडीपट्टी रंगभूमीचा सन्मानच होता.
डॉ. खुणे हे गडचिरोली जिल्ह्यच्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी आहेत. त्यांनी कला क्षेत्रात पाच हजाराहून अधिक कार्यक्रमांमध्ये ८०० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ते गेल्या पन्नास वर्षापासून झाडीपट्टीच्या भव्य रंगभूमीचे रसिकप्रिय नट आहेत. आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः झाडीपट्टीतील सोंगाड्या तथा ज्यूनियर दादा कोंडके अशीही त्यांची ख्याती आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात लीलया पदार्पण करणारे परशुराम खुणे हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे.ते पंधरा वर्षे गुरनोलीचे सरपंच व पाच वर्षे उपसरपंच होते. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार त्यांनी झाडीपट्टीतील सर्व रसिक प्रेक्षकांना समर्पित केला. सतत कार्यमग्न, मनमिळावू तडजोड वृत्तीचे, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, कलाप्रेमी दूरदृष्टीचे असे त्यांचे व्यक्तिमत्व इतरांना प्रभावित करणारे आहे.
भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाचा बहुमान त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच झाडीपट्टी कलावंतांना प्राप्त झाल्याचा आनंद रसिक प्रेक्षक अभ्यासकांना निश्चितच आहे.
झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत विनोदाचे बादशहा, मागील पाच दशकांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर आपल्या अभिनय क्षमतेने नाममुद्रा कोरणारे, रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेले नटसम्राट म्हणजेच डॉ. परशुराम खुणे होय. गडचिरोली जिल्ह्यातील गुरनोली येथे २२ फेब्रुवारी १९५२ ला जन्मास आलेल्या या कलावंताने झाडीपट्टीतील विविध भागात नाट्यप्रयोगाबरोबरच कर्तुत्वाने आपली उंची राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवली आहे. सधन शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या परशुराम खुणे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही नाट्य क्षेत्रातच अधिक रस ओतला आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेली अंधश्रद्धा नष्ट व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही त्यांनी सामाजिक भान ठेवत केलेले आहे.

नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित शेतकरी अभ्यास युरोप दौऱ्यात सहभागी झाले आहेत. स्विझर्लंड , पॅरिस यासारख्या भागातील शेतकऱ्यांच्या वैभव संपन्नतेचे अवलोकन करीत आहेत.विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने त्यांनी ठसा उमटवला आहे. ग्रामीण झाडीपट्टीतील प्रेक्षकांना त्यांच्याच शैलीत प्रगटीकरण करीत अढळ स्थान पद्मश्री डॉ. खुणे यांनी निर्माण केले आहे.
डॉ. परशुराम खुणे यांनी कॉमेडी ,सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक, धार्मिक, ज्वलंत विषयावरील अशा विविध अंगी नाटकात
वेगवेगळ्या भूमिका साकारले आहेत. त्यात प्रामुख्याने चरित्रप्रधान व विनोदी भूमिकांना रसिकांनी कायम स्मरणात ठेवले आहे. म्हणूनच झाडीपट्टीचा दादा कोंडके असे नामाभिधान अथवा ओळख या नाट्य कलावंतांच्या अष्टपैलू कर्तृत्वामुळे प्राप्त झाली आहे.गावातील सांस्कृतिक वातावरण व घरची कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे दंडारीतून हौशी कलावंत म्हणून त्यांना नाट्य क्षेत्रात पदार्पण केले.नवरगाव येथे शिक्षण घेत असताना बालाजी पाटील बोरकर यांच्या व्यंकटेश प्रासादिक नाट्य मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी १६ जानेवारीला नाटके होत असत. बालाजी पाटील बोरकर, सुधाकर जोशी, जयमातला शिलेदार या दिग्गजांच्या सहवासात परशुराम खुणे यांच्या अभिनय क्षमतेला तेज प्राप्त झाले. ‘तंट्या भिल्ल’ या नाटकात त्यांना ऐनवेळी सोन्या या मुलाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आणि डॉ. जोशी, पुष्पा पवार, वसंत पवार यासारख्या श्रेष्ठ कलावंतांच्या सोबतीने अभिनयाची चुणूक दाखवता आली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातील हॉटेल मॅनेजरची त्यांची भूमिका विशेष गाजली. या विनोदी भूमिकेतील वैशिष्ट्यपूर्ण संवाद व देहबोलीच्या अभिनयामुळे चित्रकार धनंजय नाकाडे आणि बालाजी पाटील बोरकर यांनी त्यांना विनोदी कलावंत म्हणून नावारूपास आणले. पुढे व्यंकटेश प्रसादिक मंडळाच्या विविध विनोदी भूमिका करण्याची संधी परशुराम खुणे यांना प्राप्त झाली. प्रामुख्याने’ दिवा जळू दे सारी रात’ या नाटकातील मदन या भूमिकेने त्यांना लौकिक प्राप्त झाला. येळकोट मल्हार मधील खाशाबा, सिंहाचा छावा मधील शंकर, लग्नाची बेडी मधील अवधूत, तंट्या भिल्ल मधील जेलर यासारख्या भूमिका परशुराम खुणे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय क्षमतेने गाजविल्या आणि रसिकप्रिय ठरल्या.स्वर्गातील स्वारी मध्ये भद्राक्ष ,एकच प्याला मधील तळीराम, लावणी भूलली अभंगाला मधील गणप्या या भूमिका आजही झाडीपट्टीतील प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सातशे पेक्षाही अधिक प्रयोग झालेले लोकप्रिय नाटक ‘मरीमाईचा भुत्या’ मधील वनरक्षक, एक नार तीन बेजार मधील बहिरा, नाथ हा माझा मधील बारक्या, मी बायको तुझ्या नवऱ्याची मधील दिनू असे अनेक पात्रे त्यांनी जिवंत साकारली.धनंजय नाकाडे यांनी म्हणूनच एकूण त्यांचीअभिनयक्षमता पाहून झाडीपट्टीचा सोंगाड्या ज्युनिअर दादा कोंडके ही पदवी त्यांना बहाल केली. किंबहुना त्यांनी दिलेला भेट स्वरूपातील कोट व शाबासकीची थाप पुढील वाटचालीस प्रेरणादायी ठरली.
सडपातळ शरीरयष्टी, प्रसन्न मुद्रा, भारदस्त आवाज, जबरदस्त पाठांतर व परफेक्ट टाइमिंग यामुळे त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.डॉ. परशुराम खुणे यांनी अभिनय करताना कधीच कोणाची नक्कल केली नाही. सभोवतालचे इरसाल नमुने नेहाळत त्यांच्या स्वाभाविक बोलण्यातील संवाद हेरून त्याचा पालपद म्हणून उपयोग करत प्रेक्षकांना हसविण्यात त्यांचा हातखंडा होता. किंबहुना इतर कलावंतांना सुद्धा कुणाचे नक्कल न करतां आपले वेगळेपण सिद्ध करण्याची सक्त ताकीद देतात.

सतत पंधरा वर्षे ते सरपंच म्हणून गुरनोलीच्या राजकारणात सक्रिय राहिले पाच वर्षे उपसरपंच म्हणून कार्य करत त्याने गावाचाही कायापालट केला. त्यांच्या एकूण कर्तृत्वामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, कला गौरव, जादूगर पुरस्कार, स्मिता स्मृती पुरस्कार, झाडीबोली साहित्य परिषदेचा पुरस्कार ,झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद, अखिल भारतीय अकादमीचे अध्यक्ष, कलाभूमी पुरस्कार, जिल्हा गौरव पुरस्कार, छोटा गंधर्व स्मृति नाट्य पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवांकित करण्यात आले आहे. निरंतर झाडीपट्टी रंगभूमीची आराधना करणाऱ्या समर्पित कलावंतांची या पुरस्कारामुळे त्याच्या कार्याची योग्य दखल घेतली गेली.
नाट्य क्षेत्राबरोबरच त्यांनी ‘रंग माझा वेगळा’ पहिले पाऊल जीवनाचे निबंध यासारख्या चित्रपटात ही भूमिका केल्या परंतु नाटक आणि चित्रपटांमध्ये त्यांना खूप फरक जाणवतो चित्रपटापेक्षा नाटकांमध्ये प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर जिवंतअभिनय करताना अधिक आनंद समाधान मिळते, ते व्यक्त करतात. झाडीपट्टी रंगभूमी संपन्न व समृद्ध करणारे जेष्ठ रंगकर्मी डॉ. परशुराम खुणे हे आता अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहेत त्यांचा एकूणच कलाप्रवास ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूपाचा आहे. त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाला सलाम. या निमित्ताने डॉ. परशुराम खुणे यांना दीर्घआयुरारोग्य लाभो, हीच वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा..!

डॉ. राजकुमार मुसणे,
गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here