
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नकोडा गावातील ज्येष्ठ समाजसेवक व माजी डब्ल्यूसीएल कर्मचारी हबीब पटेल (वय ७५ वर्षे) यांना रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानित करण्यात आले. मुस्लिम बांधवांप्रती आदर, सामाजिक ऐक्य व सलोखा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा सदिच्छा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हबीब पटेल यांनी सन १९७५ मध्ये डब्ल्यूसीएल (अंडरग्राउंड) च्या माध्यमातून नकोडा येथील डिस्पेन्सरीमध्ये सेवा सुरू केली. सुरुवातीच्या काळात मर्यादित साधनसामग्री आणि अल्प स्टाफ असतानाही त्यांनी वडाच्या झाडाखाली तात्पुरत्या स्वरूपात सेवा कार्याची सुरुवात केली होती. अंडरग्राउंड खाणींमध्ये घडणाऱ्या अपघातांमध्ये जखमी कामगारांना तत्परतेने उपचार देत त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. दिवस-रात्र न पाहता केलेल्या त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला.
सेवेतील प्रदीर्घ कारकीर्द पूर्ण करून निवृत्तीनंतरही ते आपल्या परिवारासोबत सुखसमाधानाने जीवन व्यतीत करत आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी हबीब पटेल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सेवाभाव हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. रमजानच्या या पवित्र काळात अशा ज्येष्ठ सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणे ही गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.















