prabodhini news logo
Home ठळक बातम्या मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
135

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुरावानंतर मनपाकडून १ कोटी १५ लाखांची मदत जाहीर

औरंगाबाद प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मुकुंदवाडी गाव परिसरात बॅनर काढण्याचे काम सुरू असताना विद्युत तारेचा धक्का लागून अमोल दिनकर जाधव (२९, रा. संजय नगर) या मनपा सफाई कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत रवी रीडलोन हे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मनपा प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरात अनधिकृत बॅनर काढण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू होते. यावेळी विद्युत वाहक तारांचा अंदाज न आल्याने अमोल जाधव यांना जोराचा करंट लागला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या कामावेळी सुरक्षेची कोणतीही साधनं पुरवण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे.

ही घटना मनपा प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात धाव घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी आणि अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनपा आयुक्त यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मयत अमोल दिनकर जाधव यांच्या कुटुंबियांना विमा योजनेअंतर्गत १ कोटी १५ लाख रुपये आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शासनाच्या वतीने बॅनर लावणाऱ्या संबंधितांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला तात्काळ न्याय व सर्व शासकीय मदत मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here