
जत्रा घडली नागोबाची या महानाट्यास पुरस्कार प्रदान .
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दि.२१ फेब्रुवारीला झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार व महसूल विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील से.नि.कर्मचारी/साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती,संवाद पुणे व यशदा पुणे यांचे वतीने दरवर्षी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे करीता राज्य स्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते. व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात तांत्रिक विषयावरील विषयविशिष्ट साहित्य संवर्गातील मराठी नाट्यवाड्.मय साहित्य प्रकारात नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित व नाट्यश्री निर्मीत जत्रा घडली नागोबाची या महानाट्यास यंदाचा नाट्यलेखनाचा ‘उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार- २०२६’ प्रदान करण्यात आला.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या भव्यदिव्य दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन – २०२६ तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.महेश भागवत (भा.प्र.से.अतिरिक्त पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, तेलंगणा), पुर्वाध्यक्ष मा.शेखर गायकवाड (भा.प्र.से.अतिरिक्त महासंचालक, यशदा पुणे),यांचे हस्ते व मा. राजीव नांदकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक – यशदा पुणे), डॉ. किरण धांडे(भा.प्र.से. तथा प्र.अ. प्रकाशन, यशदा पुणे), वैशाली पतंगे (भा.प्र.से.यशदा पुणे), व्यंकटेश कल्याणकर (भा.प्र. से.तथा प्रकल्प संशोधक,यशदा पुणे), सार्थक थोरवत (भा. प्र.से. माध्यम व प्रकाशन केंद्र, यशदा पुणे) तसेच अनेक भा.प्र.से. व महाराष्ट्र शासन सेवेतील अनेक उच्च पदस्थ अधिकारी इ. व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, व ग्रंथभेट असे आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशामुळे महसूल विभागाची तसेच गडचिरोली जिल्ह्याची व झाडीपट्टीची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, सुनील चडगुलवार (से.नि. नायब तहसीलदार) महसूल विभाग, झाडीपट्टी कलावंत संघटना, गडचिरोली व झाडीपट्टी लेखक संघटना गडचिरोली जिल्हा यानी व्यक्त केली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, रमेश निखारे, प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा.डॉ. योगीराज नगराळे, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, डॉ. दिपक चौधरी, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक), महसूल विभागातील अधिकारी/ कर्मचारी, इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.















