prabodhini news logo
Home गडचिरोली भेंडाळा जमीन अधिग्रहणाविरोधात कष्टकरी जनतेचा इशारा – अन्यायग्रस्तांसोबत भाकपा ठाम

भेंडाळा जमीन अधिग्रहणाविरोधात कष्टकरी जनतेचा इशारा – अन्यायग्रस्तांसोबत भाकपा ठाम

0
144

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी सुपीक, सिंचनाखालील व बारमाही पिक देणाऱ्या शेतजमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. या जमिनीवरच हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून असून जमीन गेल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक ग्रामसभांची संमती न घेता आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन, रोजगार व पर्यावरणीय परिणामांविषयी स्पष्ट हमी न देता अधिग्रहणाची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की,
“सुपीक शेतीजमीन हिरावून घेणे म्हणजे कष्टकरी जनतेच्या पोटावर लाथ मारणे होय. अन्यायग्रस्त व प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या बाजूने भाकपा ठामपणे उभी आहे. विकासाच्या नावाखाली भांडवलदारांच्या हितासाठी शेतकरी–शेतमजुरांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.”

ते पुढे म्हणाले की, “जमीन, जल व जंगलावर पहिला हक्क हा कष्टकरी जनतेचा आहे. योग्य मोबदला, हमीदार पुनर्वसन, कायमस्वरूपी रोजगार आणि ग्रामसभेची संमती याशिवाय कोणतेही जमीन अधिग्रहण मान्य होणार नाही.”

भेंडाळा परिसरातील अन्यायग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांनी आपल्या समस्या व माहिती मांडण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी – मो. 9423660364

भाकपा कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढा देईल, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here