
एपस्टिन फाईल्स प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक
जालना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना येथे केंद्र सरकार आणि संबंधित उद्योगपतींविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वाखाली जुना जालना भागातील गांधी चमन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती अनिल अंबानी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्या फोटोंची होळी करून निषेध नोंदवण्यात आला.
नुकत्याच समोर आलेल्या एपस्टिन फाईल्समध्ये भारतातील काही बड्या नेत्यांची आणि उद्योजकांची नावे आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत जालन्यात हे आंदोलन केले. देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन करणाऱ्या या व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी भूमिका यावेळी जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी मांडली.
गांधी चमन येथे झालेल्या या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने प्रशांत कजबे (जिल्हा महासचिव), शेख लालाभाई (जिल्हा उपाध्यक्ष), प्रकाश मगरे (बदनापूर तालुका अध्यक्ष) हरिष रत्नपारखे (युवा जिल्हा उपाध्यक्ष), गौतम वाघमारे (जालना तालुका सचिव) दिपक खाजेकर (तालुका महासचिव), अमोल वाहुळे (सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष), विलास भिंगारे, सचिन घोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. एपस्टिन फाईल्समधील नावांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.















