
स्त्री म्हणजे सहनशिलता आणि सामर्थ्य यांचा एक अद्भुत संगम आहे.सहनशिलतेचा प्रतीक म्हणून आज स्त्रीची गणना केली जाते.संकटकाळात संघर्ष करण्याची जिद्द तिच्यात निर्माण होते. स्त्री ही अबला नसून ती सबला आहे.पुरूषांना जीवनात लढा देत पुढे कसे जायचे हे शिकविणारी जीवनदर्शिका म्हणजे ही स्त्री आहे.स्त्री ही संयम आणि नात्यांना जपण्याची सहनशिलता बाळगते.जी तिला भावनिकदृष्टया सक्षम बनवते.ती केवळ कठिण परिस्थितीत शांत राहून सहन करत नाही,तर योग्य वेळी प्रचंड मानसिक आणि भावनिक बळाने उभी राहते
आज जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.या दिवशी आपल्या महिलांच्या योगदानाची. तपश्चर्याची आणि त्यागाची आठवण करून देण्याचे आणि महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते.
“ती आहे म्हणून विश्व आहे असे समजले जाते”
छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ ,रणरागिनी होऊन संघर्षाचा बळ देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि मातृत्व ,नेतृत्व तसेच कर्तुत्व सिद्ध करून रायगडाचा निमुळता कडा उतरून आपल्या बाळाला दुध पाजण्यासाठी धाडस करणारी हिरकणी, भारताच्या पहिल्या महिला डाँ.आनंदीबाई जोशी,अनाथाची माय शिधुंताई सपकाळ, आकाशात झेप घेणाऱ्या कल्पना चावला,बाबासाहेबाची सावली असणारी त्यागमूर्ती रमाबाई तसेच मानवतेची ज्योत तेवत ठेवणार्या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा.
महिलांनी भीती न बाळगता मुक्तपणे जगावे. तिच्या स्वप्नांची इच्छा आकांक्षाना नव बळ मिळावे म्हणूनच खरंतर महिला दिन साजरा केला जातो. महिला दिन आला की तिच्या कर्तुत्वाचा तिच्या महानतेचा गोडवा गायला जातो. तिचा सत्कार केला जातो .पण हा सोहळा फक्त एका दिवसात पुर्ताच मर्यादित आहे. फक्त एक दिवस तिचा सत्कार केला जातो आणि इतर दिवशी फक्त तिचा अपमानच होतो.स्त्रीच्या वाट्याला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेले आहे.हे मळभ हटविण्यासाठी तिचा निकराचा लढा सुरूचआहे.अनेक क्षेत्रात स्त्री तळपती समशेर(तलवार) बनून ती आपल्या शत्रूशी लढत आहे.हे शत्रू किती आहेत हे ओळखणे अवघड आहे.स्त्रीची, जगातील सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळ्याला नख लावण्याचे दृष्टकार्य केले जाते.तेही जन्मदात्या आईबापाच्या संमतीने आणि आजी,आजोबा, आत्या,मामा यांच्या साक्षीने, कदाचित आईच्या मनाविरूद्ध ते घडत असेल. आपल्या गर्भाच्या मृत्यूबरोबर मातृप्रेमाच्या,वात्सल्याच्याही चिंधड्या उडविल्या जाताना त्या स्त्रीला बघावे लागते.स्त्रीने जगात प्रवेश केल्यावरही भय इथेच संपत नाही.घरातील नातेवाईकापासून तर गावातील गुंडापर्यत स्त्रीच्या “वाटेवरच्या काचा “बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो.
प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. हे विधान काही चुकीचे नाही. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागे प्रेरणा असणाऱ्या माँसाहेब जिजाऊ आहेत. स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या रणरागिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई आज इतिहासात अजरामर आहेत.स्त्री शिक्षणासाठी झटणार्या क्रांतीज्योती सावित्रीमाई मुळे स्त्री शिक्षित झाली आहे.स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेतलेली आहे.
आज पुरुषाबरोबर स्त्रियादेखील सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे.परंतु आज देखील स्त्री सुरक्षित नाही हे खेदाने बोलावे लागते.लैंगिक शोषण,अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या ,मुलीच्या मनात भितीची,असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्यावर तिचा तिरस्कार केला जातो. तिचा अपमान केला जातो. कारण आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. स्त्रीला प्रत्येक वेळी अपमानच भोगावा लागतो. स्त्रीच्या आयुष्यातील स्वप्न सोहळा म्हणजे तिचे लग्न होय.ती आपल्या संसाराची स्वप्न रंगवित असते. पण नव-याच्या आई, बहिणीच्या रोषाला बळी पळते.त्यांची विचारशक्ती स्टोव्हच्या इंधनापेक्षाही जास्त ज्वालाग्रही असते. पती पत्नीच्या संसारात हा ज्वालाग्रही स्फोट करून त्या स्त्रीच्या स्वप्नाची राख करतात.मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर तिचा छळ केला जातो. तेव्हा ती सुरक्षित असते का? ती आपल्या हक्काचे माहेर सोडून सासरी जाते.तेव्हा त्या मुलीला सासरचे रीतिरिवाज माहीत नसते. त्यासाठी तिला पहिले समजावून सांगितले पाहिजे.तिच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव दिले पाहिजे. असे तर होत नाही. उलट तिच्यावर दबाव टाकला जातो.तिला फक्त चूल आणि मूल ह्या व्यतिरिक्त कुठल्याच गोष्टीचा स्वातंत्र्य दिला जात नाही.तिच्या भावनांचा तिच्यातील असणाऱ्या गुणांचा कधीच विचार केला जात नाही. कारण तिला कधीच समजून घेतलेले नाही. तिच्यातल्या सुप्त गुणांचा ते कधीच विचार करीत नाही.नवीन घरात येणा-या त्या मुली विषयी उलट विचार करतात. तुला काय समजते असे म्हणून तिच्या मनातील भावना दाबल्या जातात.सासू नावाची स्त्री, सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का कारते? हे मानव जातीला आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे.स्त्रीला निसर्गाने प्रेम नावाची विलक्षण देणगी दिली आहे.तेच स्त्रीचे शस्त्र आहे.या शस्त्राद्वारे स्त्रीने अनेक अवघड कसोट्या सहजरित्या पार पाडल्या आहेत. स्त्रीच्या शब्दात मंत्राचे सामर्थ्य आहे .या शब्दांनी ती अग्नी फुलवूही शकते.आणि विझवूही शकते. स्त्रीच्या डोळ्यातल्या अंगाराला कायद्याचे कवच लाभले तर दुष्कर्म करणारे निश्चितच पुढे येण्यास घाबरतील.म्हणूनच म्हणते की, स्त्रीला अजूनही पाहिजे तो मानाचे स्थान प्राप्त नाही.
जर स्त्रीने आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलात, तर तिच्यावर आरोप लावून घराबाहेर काढले जाते किंवा घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला जातो.कारण आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे. स्त्री आणि पुरुष समानता हे फक्त लिहिलेले आहे त्याची कधी अमल बजावणी होणार का? की स्त्रीला फक्त टांगत्या तलवारीचे स्थान मिळणार का ?
स्त्री जर स्वतंत्र असती तर, तिच्यावर कुठल्याच प्रकारचे अत्याचार झालेच नसते.आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या जंजिरात ती जखळलेली आहे. एखादी नोकरी करणारी स्त्री असेल तर तिचा अधिकारी तो पुरुष असेल तर तिला कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून तो छळणारच मग स्त्री ही कुठे सुरक्षित आहे ? घरातून बाहेर निघणा-या मुलीला घरी येईपर्यंत तिच्या घरच्या लोकांच्या नजरा तिच्या येण्याची वाट बघत असतात.की आमची मुलगी कधी घरी लवकर येणार, यायला उशीर झाला तर मनात नको ते प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच म्हणते की स्त्री ही अजूनही सुरक्षित नाही.
आजही महिलावर अत्याचार होतात. जर एखाद्या स्त्रीला मुलीच झाल्या तर, घरचे लोक त्या स्त्रीलाच जबाबदार ठरवितात. पण ते आपल्या मुलाला दोष देत नाही.किंवा स्त्रीला मुलं होत नसेल तर…! सुद्धा स्त्रीलाच दोष दिला जातो…..आणि त्या मुलाचे दुसरे लग्न करण्यास तयार होतात. ते कायदेशीर गुन्हा असून सुद्धा त्या स्त्रीवर अत्याचार,छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करतात…किंवा तिच्याकडून खोटी परवानगी घेतली जाते…तर, एखाद्या स्त्रीला मुलीच झाल्या आणि दुसऱ्या स्त्रीला मुलगा झाला तर ती स्त्री आपल्या मुलाला पदरात लपवून नेते.म्हणजेच तिचा गैरसमज असते की, या स्त्रीची दृष्ट लागेल….पण हे सत्य नसते.हे समाजाने मना किंवा जवळच्या नातेवाईकानी कुठेतरी थांबविले पाहिजे. तरच कुठे स्त्री ही सुरक्षित राहील …नाहीतरी हे फक्त सांगण्या पुरते आहे….जग किती पुढे गेला तरी …तिच्यावर होणार अत्याचार, अन्याय कधीच कमी होणार नाही ….हे सर्व बंद होईल तेव्हाच ख-या अर्थाने स्त्री सुरक्षित होईल असे मला तरी वाटते.
लेखिका
सौ.ज्योत्स्ना भास्कर बन्सोड
कुरखेडा जि.गडचिरोली















