
हृदयी अमृत नयनी पाणी असा जिचा उल्लेख केला जातो त्या स्त्रीचा सन्मानाचा , अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस म्हणजे आठ मार्च महिला दिन . हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान करण्याचा दिवस .स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो . महिलादिनी प्रत्येक घराघरातल्या कामगार स्त्रीपासून तर उच्च पदापर्यंतच्या महिलांचा कार्य कर्तुत्वाचा सन्मान केला जातो.
जुना इतिहास बघितला तर राजमाता जिजाबाई, आनंदीबाई जोशी , सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर ,पंडिता रमाबाई, आणि आनंदीबाई जोशी अशा बऱ्याच महिलांनी एक क्रांतिकारी इतिहास घडविला.मात्र महिला दिन साजरा करताना सर्वप्रथम भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ज्यांना मान मिळाला त्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिलांच्या शिक्षणाबाबत खूप मोठे आहे .त्यामुळे आजच्या आधुनिक काळातील स्त्रिया शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवत आहे . प्रत्येक क्षेत्रात तिने उंच भरारी घेतली आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सध्याच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यासारख्या अनेक स्त्रियांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले कर्तुत्व सिद्ध केले .मात्र महिला दिन ठिकठिकाणी साजरा होत असताना मनात जुन्या गोष्टीचे स्मरणही होते .अनादि काळापासून स्त्रीला चूल आणि मुल या बरोबरच धार्मिकतेमध्ये गुंतविले गेले होते.अंधश्रद्धेच्या गर्रतेत तिला बुडविले होते.ती चाकोरीबद्ध जीवन जगत होती . कालांतराने स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडल्यानंतर तिची शिक्षणाने स्वतःची ओळख होऊ लागली . आणि पुढे जाऊ लागली.असे असले तरी मात्र आजची परिस्थिती पाहता तिला अजूनही वैचारिकतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसतो.आज धार्मिकतेबरोबरच वैचारिक होणे ही काळाची गरज आहे.यातूनच वैचारिकतेचे दान समाजात वाटून एक वैचारिक समाज निर्माण होऊ शकतो.बऱ्यापैकी काही स्त्रिया हे वैचारिकतेचे दान सभा आणि मेळावे मध्ये वाटताना दिसतात.खरंच त्यांचे खूप कौतुक करावेसे वाटते.सध्याची परिस्थिती बघितली तर आज पुरुष स्त्रियांना आदरपूर्वक सन्मान देताना दिसतात .लेडीज फर्स्ट म्हणून तिला कोणत्याही कार्यात पुढे केले जाते.तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात .आता तर घरातील जबाबदारी दोघांनीही वाटून घेतली आहे .त्यामुळे महिलादिनी पुरुषांचेही कौतुक होणे गरजेचे आहे .मात्र आजही समाजातील वाईट पुरुषी प्रवृत्तीचा स्त्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट असते .या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात ती आवाज उठवण्याचा प्रयत्न करते . तिच्यात लढण्याची ताकद असली तरी तिला मात्र कुठे ना कुठे इतरांच्या दबावाखाली येऊन माघार घ्यावा लागते.
नात्याच्या बाबतीत लिहायचं झालं तर आजच्या स्त्रीने पती-पत्नीचं नातं टिकवून ठेवायला हवे .वाद कुणाचे होत नाही , आई मुलाचे ,बहीण भावाचे, बहिणी बहिणीचे, आणि इतरही नात्यातील तरीसुद्धा मग हे नातं तुटतं का? आपण तोडतो का ? मुळीच नाही ना, मग का म्हणून आपण लग्न झाल्यावर थोड्या थोडक्या गोष्टीसाठी नातं तोडावे.कुटुंब व्यवस्था ही आपल्याला फार गरजेची आहे.त्यामुळे त्या घरात प्रेम असायलाच पाहिजे.एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असायला हवी.तिसऱ्या लोकांमुळे दोघांमध्ये जो गैरसमज पसरविला जातो तो दोघांनीच समजदारीने सोडविला पाहिजे. आणि नातं आजन्म टिकून ठेवायला हवे. पण जर का खरोखरच अन्याय अत्याचार होत असेल तर अशा फसव्या नात्याला तिलांजली द्यायलाच हवी.महिला दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने लिहावी वाटते की ज्या महिला कर्तुत्व करूनही पडद्याच्या आड आहे .त्यांच्या गौरवगाथा जगासमोर येणे गरजेचे आहे.प्रत्येक सामान्य महिलेला आत्मविश्वासाच बळ मिळायला हवे . राज्यघटनेने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार, महिलांचे अधिकार ,त्यांचे हक्क, महिलांच्या बाजूने असणारे कायदे ,महिलांना मिळणाऱ्या सवलती यांची अधिकाधिक माहिती स्त्रीने स्वतः करून घ्यायला हवी .एवढे जरी केले तर तळागाळातील महिला यशाचे सर्वोत्तम शिखरे गाठू शकते. चला तर मग एक पाऊल पुढे टाकून स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना एकत्र जोडूया. एकमेकींना मदतीचा हात देऊन जीवनात पुढे पुढे जाऊन सक्षम होऊया.
संगीता राजेश नागदिवे
यवतमाळ















