prabodhini news logo
Home चंद्रपूर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या महिला...

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या महिला व युवतींचा सन्मान

0
117

घरापासून देशा`पर्यंत महिलांचे योगदान अमूल्य – आ. किशोर जोरगेवार

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – स्त्री ही केवळ एका घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाची ताकद असते. घरातील प्रत्येक व्यक्तीला संस्कार देण्याचे, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि कठीण परिस्थितीतही धैर्याने उभे राहण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये असते. महिला हीच घराचा खरा आधारस्तंभ असून घरापासून देशापर्यंत महिलांचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, चंद्रपूर महानगरच्या वतीने भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या महिला व युवतींचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर संगीताताई खांडेकर, स्त्री रोग तज्ञ डॉ. शीतल सोनारकर, त्वचारोग तज्ञ डॉ. स्नेहल पोटदुखे, नायब तहसीलदार गीता उत्तरवार, सामाजिक कार्यकर्ता वृंदा काळे, माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, मनपा गट नेते शेखर शेट्टी, महामंत्री सविता दंडारे, नगर सेवक संजय कंचर्लावार, विमल कातकर, कौसर खान, नगर सेविका शीतल गुरनुले, पुष्पा उराडे, सारला कुळसंगे, अनुजा तायडे, आशा देशमुख, सारिका संदूरकर, ज्योती जीवणे, रॉबिन विश्वास आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्या घरातच आई-अम्माच्या रूपाने स्त्रीशक्तीचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. अत्यंत प्रतिकूल आणि संघर्षमय परिस्थितीतही तिने संपूर्ण कुटुंब एकत्र सांभाळत उभे केले. फुटपाथवर टोपल्या विकण्याचे कष्टाचे काम करत तिने परिवाराची जबाबदारी समर्थपणे पेलली आणि मुलांना घडवण्याचे महान कार्य केले. आईच्या त्या जिद्दीने, कष्टाने आणि त्यागानेच आम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच महिलांच्या संघर्षाची आणि त्यांच्या योगदानाची खरी किंमत मला जवळून अनुभवता आली, असेही ते यावेळी म्हणाले.
आई म्हणून ती मुलांना संस्कार देते, बहीण म्हणून आधार देते, पत्नी म्हणून जीवनाचा प्रवास सोपा करते आणि मुलगी म्हणून घरात आनंद निर्माण करते. एका कुटुंबाला योग्य दिशा देण्याचे काम स्त्री करते आणि त्या कुटुंबातूनच सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र निर्माण होते.
लोकप्रतिनिधी म्हणून आपणही महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन, शिवणकाम यांसारखे महागडे प्रशिक्षण आपण महिलांना निशुल्क उपलब्ध करून दिले. जवळपास पाच हजार महिला या प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षित झाल्या असून यातील अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार उभा केला असल्याचे ते या प्रसंगी म्हणाले. प्रत्येक महिन्यात महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे ते यावेळी म्हणाले.
आजच्या आधुनिक काळात महिलांनी केवळ घरापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर शिक्षण, उद्योग, विज्ञान, क्रीडा, प्रशासन आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. आपल्या देशात अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने जगाला प्रेरणा दिली आहे. आज भारतीय महिला सैन्यात, अंतराळ संशोधनात, न्यायव्यवस्थेत आणि उद्योग क्षेत्रातही मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. हे चित्र आपल्या समाजाच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात महापौर संगीताताई खांडेकर, स्त्री रोग तज्ञ डॉ. शीतल सोनारकर, त्वचारोग तज्ञ डॉ. स्नेहल पोटदुखे, नायब तहसीलदार गीता उत्तरवार, यांनीही महिलांना मार्गदर्शन करत, महिलांचे सशक्तीकरण म्हणजे केवळ त्यांना संधी देणे नाही, तर त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे असल्याचे सांगितले. महिलांना शिक्षण, सुरक्षितता आणि स्वावलंबन मिळाले तर त्या केवळ स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य उज्ज्वल करू शकतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या महिला व युवतींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायली येरणे, प्रज्ञा बोरगमवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, नीलिमा वनकर, अल्का मेश्राम,अनिता झाडे भागेश्री हांडे, माला पेंदाम, अस्मिता दोनाडकर, हेमलता खोब्रागडे, रेश्मा पांडे, सुषमा तपासे यांच्या सह भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here